जळगाव जिल्ह्यात ४२ रेशन दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:00 PM2020-06-23T13:00:53+5:302020-06-23T13:01:32+5:30
१२ दुकाने निलंबित तर १५ दुकानांचे परवाने रद्द
जळगाव : लॉकडाऊनमध्ये लाभार्थ्यांना रेशन वाटपात काळाबाजार करणाऱ्या जिल्ह्यातील आतापर्यंत ४२ रेशन दुकानदारांवर जिल्हा पुरवठा विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १२ दुकानांवर निलंबनाची तर १५ दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सरकारतर्फे सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना रेशन वाटप करण्याचे जाही करण्यात आले होते. सर्व लाभार्थ्यांपर्यंत हे रेशन पोहचविण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा विभागाला देण्यात आल्या होत्या. संबंधित रेशन दुकानदारांकडून रेशन वाटपात अनियमितता आणि काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे दररोज प्राप्त होत होत्या. त्यानुसार करण्यात आलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी काळाबाजार आढळून आला होता. लॉकडाऊनच्या तीन महिन्यांमध्ये ४२ रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर, पाचोरा, यावल या तालुक्यातील एकूण १२ दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहर, रावेर, धरणगाव, भुसावळ व चाळीसगाव तालुक्यातील १५ दुकानदारांचे थेट परवाने रद्द करण्यात आले आहेत.
२९ हजार रूपयांचा दंड
या कारवाईमध्ये काळाबाजार करणाºया या रेशन दुकानदारांकडून एकूण २९ हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे. या सोबतच ७ दुकानदारांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले आहेत.