जळगाव : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केलेली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ३४३ जणांविरुध्द जिल्ह्यात रात्रीतून कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरात रेल्वे स्टेशनवर चहाविक्री करणाऱ्या चार विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून रेल्वेस्टेशन परिसरात चहाचे दुकान लावून गर्दी जमविण्यात आली व तेथे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर न करणे आदी नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा व्हिडिओ माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी केला होता व नंतर हा व्हिडिओ अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना पाठविला होता. गवळी यांनी रात्रीच शहर पोलिसांचे पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार अशोक भागवत पद्मे (वय ३०), सैय्यद हैदर अली (६९, दोन्ही रा.शिवाजी नगर), भगवान कडूबा पाटील (७०,रा.आसोदा, ता.जळगाव) व एहसान अली हैदर अली (२०,रा. उमर कॉलनी) या चौघांविरुध्द कलम १८८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले.
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असतानाही नागरिकांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिले आहेत. गुरुवारी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३४३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६२ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वाधिक ४७ कारवाया चोपड्यात झाल्या असून धरणगावात ३९ झाल्या आहेत. त्याखालोखाल पाचोरा ३०, यावल २३, चाळीसगाव १९, भुसावळ शहरात १७ कारवाया झाल्या आहेत.