लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी कोरोना वर मात करून ते पुन्हा कामावर रुजू झाले असून, उपायुक्त पुन्हा त्याच ॲक्शन मोडमध्ये शुक्रवारी दिसून आले. शहरातील विविध भागात फिरून मास्क न घालणाऱ्या ८० जणांवर उपायुक्तांनी कारवाई केली आहे. यासह गोलाणी मार्केटमधील स्वच्छतागृहाचा वापर स्वयंपाकगृहासाठी झाल्याचे उघड झाल्यानंतर गुरुवारी उपायुक्तांनी गोलाणी मार्केटमध्ये जाऊन त्या स्वच्छतागृहाची ही पाहणी केली.
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित असल्याने उपचारासाठी घरीच थांबले होते. कोरोना वर मात करून उपायुक्त पुन्हा महापालिकेत रुजू झाल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता उपायुक्तांनी गोलाणी मार्केटमध्ये जाऊन स्वच्छतागृहात नाश्त्याचे पदार्थ तयार करण्याचा प्रकार घडल्यानंतर या स्वच्छतागृहाची पाहणी केली. गुरुवारी पाहणीच्या दरम्यान संबंधित विक्रेत्याने स्वच्छतागृहांमध्ये लावण्यात आलेले किचन व सर्व सामान काढून घेतल्याचे लक्षात आले. यानंतर उपायुक्तांनी या ठिकाणावरून ज्या दुकानांमध्ये नाश्ताचा माल जात होता. त्याठिकाणी जाऊन माल न घेण्याच्या सूचना दिल्या. यासह संबंधित विक्रेत्यांवर ही कारवाईचे आदेश उपायुक्तांनी दिले आहेत. यासह उपायुक्तांनी गोलाणी मार्केटमधील सर्व स्वच्छतागृहांची देखील पाहणी केली.
मास्क न घालणारे रडारवर
उपायुक्त संतोष वाहुळे यांनी फुले मार्केट, टॉवर चौक , सुभाष चौक परिसर, दाणा बाजार परिसर या भागात जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान मास्क न घालणार्यांवर उपायुक्तांनी कारवाई केली. ८० नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंडाची आकारणी देखील करण्यात आली आहे. यासह बळीराम पेठ, सुभाष चौक, शिवाजी रोड या भागात भाजीपाला विक्री करणार्यांवर देखील महापालिका उपायुक्तांनी कारवाई केली आहे.