विज्ञान शाखेच्या १३४ विद्यार्थ्यांना परीक्षेची अतिरिक्त संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:33+5:302021-06-18T04:12:33+5:30
जळगाव : परीक्षेची संधी संपलेल्या विज्ञान शाखेच्या १३४ विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नुकतीच अतिरिक्त संधी ...
जळगाव : परीक्षेची संधी संपलेल्या विज्ञान शाखेच्या १३४ विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने नुकतीच अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्क भरण्याची शुक्रवार ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जून महिन्याच्या परीक्षांचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यातंर्गत विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यात विद्यापीठाकडे ऑनलाईन प्राप्त झालेल्या परीक्षा अर्जांची पहिल्या टप्प्याच्या छाननीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या संधी संपलेल्या आहेत, अशा विज्ञान शाखेच्या १३४ विद्यार्थ्यांचे जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेकरिता परीक्षा अर्ज केले असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले़ मात्र, अतिरिक्त संधी मंजूर नसतना नियमित परीक्षा शुल्क व परीक्षा अर्ज ऑनलाईन सादर केल्यामुळे ऑनलाईन प्रणालीद्वारे या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्रे निर्गमित झाली. अखेर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या विद्यार्थ्यांना अतिरिक्त संधी देण्याचा निर्णय प्रभारी कुलगुरूंनी घेतला आहे. त्यामुळे १३४ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, १८ जूनपर्यंत शुल्काची रक्कम विद्यापीठात महाविद्यालयांना सादर करावयाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अतिरिक्त शुल्काची रक्कम मुदतीत जमा केली नाही, असे विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले तरी त्यांचे निकाल जाहीर केले जाणार नाहीत, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.