चोपड्यात अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:10 PM2019-12-17T22:10:25+5:302019-12-17T22:10:39+5:30
चोपडा : शहरात हातगाडी धारकांच्या अतिक्रमणाकडे पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पोलिसांची गाडी दिसली की तेवढ्यापुरता धाक ...
चोपडा : शहरात हातगाडी धारकांच्या अतिक्रमणाकडे पालिका व पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पोलिसांची गाडी दिसली की तेवढ्यापुरता धाक धरून पळ काढला जातो. मात्र काही वेळेनंतर परिस्थिती जैसे थे होते. याबाबत अनेकदा कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पालिकेकडे व पोलीस प्रशासनाला केली आहे. मात्र या समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा संशय निर्माण होत आहे. रस्त्याच्या मधोमध उभ्या केलेल्या हातगाड्यांमुळे वाहनधारक अनेक गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते अशी स्थिती झाली आहे. याबाबत पुन्हा नागरिकांनी मुख्य रस्त्यांवरील हातगाड्यांचे अतिक्रमण काढून दुचाकीसह इतर वाहने सुरळीत चालविता यावीत यासाठी रस्ता मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. शहरात चार-पाच प्रमुख चौकांमध्ये व्यवसायासाठी मोठीच वर्दळ असते. याचा फायदा हातगाड्यांवरील व्यावसायिकांना होतो. या लहान व्यवसायांवर त्यांचा उदरनिर्वाह असल्याने त्यांना व्यवसायाचे बंधन नाही. मात्र त्यासाठी पालिकेने त्यांना स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यायला हवी. त्यामुळे इतर घटकांना त्याचा त्रास होणार नाही व शहरातील वाहतूक सुरळीत होईल. तसेच रस्त्यांवर स्वच्छता राखली जाईल. शिवाजीचौकात तर भाजीपाला, फळविक्रेते यांनी मर्यादापालनाचे सर्व नियम मोडीत काढले आहेत. व्यावसायिकांकडून प्रति दिवस येथे शहर पोलिसांची जबाबदारी आहे. मात्र तेही याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासमोरच अवैध प्रवासी वाहतूक करणारे चालक रस्त्यावरच वाहने उभी करतात. याबाबत त्वरित कारवाई व्हावी.