वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:15+5:302021-06-10T04:13:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील सर्व वाळू गटांची मुदत ही बुधवारी संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाळू गटांमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील सर्व वाळू गटांची मुदत ही बुधवारी संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वाळू गटांमधील उचल आता ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या काळात वाळूचा अवैध उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच पोलीस, महसूल विभाग आणि परिवहन विभागाची संयुक्त पथके तयार केली जाणार आहेत.
जिल्हाधिकारी राऊत यांनी सकाळी वाळू चोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसदर्भात बैठक घेतली. त्यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय परिवहन अधिकारी श्याम लोही, महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, प्रांतअधिकारी प्रसाद मते, जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राऊत यांनी येत्या काळात वाळू गटांची उचल अधिकृतरीत्या बंद असल्याने या काळात वाळू चोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही वाळू चोरी रोखण्यासाठी लवकरच पोलीस, महसूल आणि आरटीओची संयुक्त पथके तयार केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वाळू चोरी करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या.
गुरुवारपासून वाळूची उचल बंद
राज्य शासनाच्या आदेशानुसार १० जून ते ३० सप्टेंबर या काळात वाळूची उचल कुणालाही करता येणार नाही. पावसाळ्याच्या काळात वाळू उत्खनन संपूर्ण बंद केले जाणार आहे. मात्र, तरीही अनेकजण चोरट्या मार्गाने वाळू उत्खनन आणि वाहतूक करतात. असे प्रकार आढळून आल्यास त्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना दिले.