लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सौम्य, अतिसौम्य लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल न करता त्यांना मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे. अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्येच दाखल करावे व डीसीएच आणि डीसीएचसीमध्ये केवळ ऑक्सिजनची गरज असणारे व गंभीर रुग्णांनाच दाखल करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बुधवारी दिल्या आहेत. याबाबत त्यांनी आदेश काढले असून आदेशांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शहरासह जिल्ह्यात अनेक मान्यता प्राप्त खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचाराची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यात डीसीएचसी व डीसीएच याच स्तरावर या रुग्णालयांना मान्यता असून या ठिकाणी केवळ ऑक्सिजनची गरज असणारे व गंभीर रुग्ण यांच्यावरच उपचार व्हावेत, असा प्रोटोकॉल आहे. मात्र, या ठिकाणी लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयांत बेड उपलब्ध होत नसून त्यांची फरफट होत असल्याचे गंभीर चित्र होते. अखेर याबाबत कडक सूचना देत याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याची जबाबदारी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
शहरातील स्थिती
शहरात नवीन १२ रुग्णालयांना परवानगी देण्यात आली असून, यात १० डीसीएच (डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल) तर दोन डीसीएचसी (डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर) दर्जाची आहेत. पूर्वीच्या परवानगी देण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ३ डीसीएच तर १३ डीसीएचसी दर्जाची आहेत.
असे केंद्र असे आदेश
सीसीसी : सौम्य, अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करावे
डीसीएच : अत्यवस्थ, आयसीयू रुग्णांना प्राधान्य देण्यात यावे
डीसीएचसी : केवळ ऑक्सिजनची गरज असलेल्या कोविडबाधित, संशियत रुग्णांवर उपचार करावेत