लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या काळात मुलांच्या दत्तक प्रक्रियेलाही विलंब होत आहे. त्यातच जळगावला एजन्सी नाही. त्यामुळे मुले दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्यांना धुळे किंवा औरंगाबाद येथील एजन्सीच्या कार्यालयातून प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.
जळगाव जिल्ह्यातील पालकांना मुले दत्तक घ्यायची असतील, तर त्यासाठी इच्छुक दाम्पत्याला कारा या नोडल एजन्सीच्या वेबासाइटवर नोंदणी करावी लागते, तसेच त्याच्या जवळच्या कार्यालयात जाऊन त्याची अर्ज आणि योग्य त्या कागदपत्रांची प्रतही द्यावी लागते. त्यानंतर, त्यांना बालकाच्या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यानंतर, जिल्हा प्रशासन, महिला आणि बालकल्याण विभाग, न्यायालय आणि कारा यांच्या समन्वयातून त्या पालकांची योग्य ती चौकशी केली जाते. त्यांचे वय, उत्पन्न, तसेच त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता यांचाही विचार केला जातो. त्यावर आधारित एक अहवाल महिला आणि बालकल्याण विभागाकडून दिला जातो. त्यानंतरच त्या बालकांच्या दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू होते.
एखादे मूल आईनेच आपण सांभाळण्यास असमर्थ आहोत हे सांगितल्यानंतर, त्याची गुप्तपणे चौकशी केली जाते आणि योग्य असेल, तर ते मूल धुळे येथे पाठविले जाते. त्यानंतर, ते मूल योग्य त्या कार्यवाहीनंतर दत्तक घेऊ शकते, तसेच जे मूल बेवारस सापडते, त्यासाठी दोन महिने वाट पाहिली जाते. त्या मुलाच्या पालकांचा शोध घेतला जातो. त्यानंतरही दोन महिन्यांत त्या मुलाचे जैविक पालकांनी संपर्क न साधल्यास, ते मूल दत्तक जाण्यासाठी कार्यवाही केली जाते.
जळगावला एजन्सीचे कार्यालयच नाही
देशभरात मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया ही कारा (सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटी)च्या माध्यमातून केली जाते. त्याचे जळगावला कार्यालय सध्या नाही. या समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. याचे कार्यालय जळगाव जिल्ह्यात सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यात मनुष्यबळाची अडचण आहे.
रक्ताच्या नात्यात दत्तक विधान सोपे
रक्ताच्या नात्यात दत्तक घेण्याची प्रक्रिया ही दोन महिन्यांतच पूर्ण केली जाते. मात्र, त्या व्यतिरिक्त मुले दत्तक घेण्याची प्रक्रियेला वेळ लागतो. त्यासाठी योग्य त्या एजन्सीकडे जावे लागते, तसेच त्या पालकांची चौकशीही होते.
कोट -
मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या एजन्सीचे कार्यालय सध्या जळगावला नाही. त्यामुळे पालकांना धुळे किंवा औरंगाबाद येथे संपर्क साधावा लागत आहे. आता लवकरच जळगावला स्वातंत्र्य चौकात हे कार्यालय सुरू होईल. त्यासाठी सध्या मनुष्यबळाची अडचण आहे.
आकडेवारी
२०२० मध्ये दत्तक घेतली गेलेली बालके ६