६ वर्षांनंतर जळगावात पावसाने गाठली शंभरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 08:29 PM2019-09-13T20:29:48+5:302019-09-13T20:35:56+5:30

दिलासा देणारी सुखद : अवर्षण असलेल्या तालुक्यांमध्येही शंभरी पार : गिरणा ९० तर वाघूर धरणात ७१ टक्के जलसाठा

 After 5 years, the rain reached Jalgaon | ६ वर्षांनंतर जळगावात पावसाने गाठली शंभरी

६ वर्षांनंतर जळगावात पावसाने गाठली शंभरी

Next

जळगाव -यंदा वरुण राजा जिल्ह्यात मनसोक्त बरसल्याने तब्बल सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पावसाने सरासरी गाठली आहे. याआधी २०१३ मध्ये जिल्ह्यात सरासरी १०२ टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा जिल्ह्यातील ९ तालुक्यांनी शंभरीची सरासरी पार केली आहे. यामध्ये अनेक वर्षांपासून अवर्षणाची मार झेलत असलेल्या अमळनेर, जामनेर या दोन तालुक्यांचाही समावेश आहे.
काही वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने सरासरी इतक्या पावसाचीही नोंद होवू शकत नाही. यंदा सहा वर्षाचा विक्रम मोडीत काढत सप्टेंबर मध्यातच पावसाने शंभरी गाठल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने मोठे, मध्यम व निम्न प्रकल्प देखील भरून गेले आहेत. त्यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. उन्हाळ्यात नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागत असलेल्या गावांनाही यंदा दिलासा मिळणार आहे.
प्रत्येक तालुका झाला पाणीदार
२०१३ मध्ये पावसाने वार्षिक सरासरी पार केली होती. त्यावेळेस यावल, चोपडा व रावेर या तालुक्यांची सरासरी जास्त होती. मात्र, जामनेर व अमळनेर तालुक्यात देखील पावसाने देखील जबरदस्त हजेरी लावली आहे. जामनेर व अमळनेर तालुक्यात १०१ टक्के तर धरणगाव तालुक्यात ९१ टक्के पावसाने सरासरी गाठली आहे. रावेर तालुक्यात सर्वाधिक १२० टक्के पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी ७७ टक्के पाऊस चाळीसगाव तालुक्यात झाला आहे.
परतीचा पाऊस बाकी
यंदा जिल्ह्यात उशिराने मान्सून दाखल झाला. त्यामुळे जून महिन्यात वरुणराजाच रुसला होता. यामुळे यंदा देखील गेल्या वर्षासारखाच दुष्काळ रहिल अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर जुलै व आॅगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जून महिन्यातील तूट भरून काढली. दरम्यान, जिल्ह्यात होत असलेला पाऊस पश्चिमेकडून येणाऱ्या ढगांमुळेच होत असून, अजून परतीचा पाऊस शिल्लक असल्याने पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६० तर २०१७ मध्ये सरासरी ८० टक्के पाऊस झाला होता.
जळगावसह जामनेरचा पाण्याचा प्रश्न मिटला
जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. हतनूर धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणात ९० टक्के जलसाठा झाल्याने धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. गिरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाघूर धरणात देखील ७१ टक्के जलसाठा झाल्यामुळे जळगाव व जामनेर शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे.

 

Web Title:  After 5 years, the rain reached Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.