लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : तालुक्यातील ढोमणे गावाला घरोघरी नळ पाणीपुरवठा करणारी २५ वर्षांपूर्वीची पाईपलाईन खराब झाल्याने पाणी असूनदेखील नळाद्वारे पाणीपुरवठा करता येत नव्हता. अखेर आमदार मंगेश चव्हाण यांनी नवीन पाईपलाईनसाठी निधी दिल्याने आता प्रत्येक घरी पाणी येणार आहे. गावातील पाणीप्रश्न यामुळे संपुष्टात येणार आहे.
याबाबत गावचे सरपंच किशोर पाटील, मार्केट कमिटी सदस्य विश्वजीत पाटील व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता आमदार चव्हाण यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून जुनी नळपाणीपुरवठा पाईपलाईन बदलून त्याजागी नवीन पाइपलाईन कार्यरत करण्यासाठी ८ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ढोमणे गावाची पाणीटंचाई मिटून प्रत्येक घरी नळाचे पाणी येणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती दिनेश बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विश्वजीत पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, न्हावे ढोमणे गृप ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर पाटील, आर. डी. पाटील, वडाळ्याचे रवी आमले, उपसरपंच दीपक पाटील, ग्रा. पं. सदस्य वासुदेव पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पाटील, डॉ. गोरख पाटील, मुकुंदा पाटील, संजय पाटील, सुदाम सोनवणे, भगवान सोनवणे, सुनील पाटील, शांताराम पाटील, ग्रामसेवक एच. आर. पाटील, बारकू सोनवणे, सोनू सोनवणे आदी उपस्थित होते.