लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अखेर दीड महिन्यांपासून बंद असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर महापालिकेकडून पुन्हा सुरू केले आहे. विशेष बाब म्हणजे शहरात सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने दोन दिवसात याठिकाणी ३० रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने शहरातील सर्वच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली होती. यात खासगी केंद्रांचा समावेश होता. मात्र, शासकीय केंद्र सुरूच होती. रुग्ण कमी असल्याने मनुष्यबळाच्या समस्येने हे केंद्र कमी करून रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले होते. मध्यंतरी इकरा वैद्यकीय महाविद्यालयातील केंद्रही बंद करण्यात आले. मात्र, याठिकाणी असलेली व्यवस्था कायम होती. अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ गंभीर रुग्ण दाखल करायचा निर्णय झाल्याने इकराचे कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. मात्र, सौम्य लक्षणांच्या रुग्णांमध्ये अधिकच वाढ झाल्याने अखेर महापालिकेलाही हे कोविड सेंटर सुरू करावे लागले.
इकरामध्ये ५० रुग्ण
शहरात सद्यस्थितीत कोविड केअर सेंटर १, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर १ आणि जीएमसीतील काही भाग कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र ठेवण्यात आला आहे. शहरात तीन केंद्र असून, सौम्य लक्षणे असणाऱ्यांना कोविड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि गंभीर रुग्णांना जीएमसीत दाखल करण्यात येते. ही उपचारांची त्रिसुत्री आधीपासूनच तयार करण्यात आली आहे.
शहरातील कोविड सेंटर
महापालिका : ३० रुग्ण
इकरा : ५० रुग्ण
जीएमसी : ४० रुग्ण
चाळीसगाव तालुका धोक्याच्या वळणावर
चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे चित्र आहे. सरासरी रोज तीस रुग्ण याठिकाणी आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर याठिकाणचे कोविड केअर सेंटर सुरूच आहे. तीनही उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हे केंद्र सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामीण
कोविड केअर सेंटरमधील रुग्ण : १०
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमधील रुग्ण : २०६
कोट
ज्याठिकाणी रुग्णवाढ समोर येत आहे, त्याठिकाणचे कोविड केअर सेंटर आपण सुरूच ठेवले आहे. जिल्ह्यात सीसीत ९,६९७ बेड उपलब्ध आहेत. आपण कोविड सेंटर रुग्ण नसल्याने बंद केले मात्र त्याठिकाणी व्यवस्था आहेच. यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. पुरेसे बेड आपल्याकडे उपलब्ध आहेत. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक