महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर अजित पवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 10:01 AM2022-09-15T10:01:14+5:302022-09-15T10:02:40+5:30
Ajit Pawar : अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते.
- प्रशांत भदाणे
जळगाव : फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे.
अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फॉक्सकॉन वेदांता प्रकल्पाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प राज्यात यावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न झाले होते. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. या प्रकल्पासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा सुरुवातीला विचार करण्यात आलेला होता. आमचा कोणत्याही राज्याला विरोध नाही, पण आमच्या राज्यातील प्रकल्प कोणाच्या तरी दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.
आम्ही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावं, प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच रहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी आमच्या सरकारने प्रकल्पाला विविध सवलती देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. या प्रकल्पासाठी तळेगाव येथील जमीन देखील निश्चित करण्यात आलेली होती, असे अजित पवार म्हणाले.
प्रकल्पासाठी त्या ठिकाणी सर्व गोष्टी पूरक होत्या. हा प्रकल्प गुजरातला नेल्यानंतर आता गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे. आमचं तर म्हणणं आहे की हा प्रकल्प पण महाराष्ट्रातच व्हावा आणि दुसरा प्रकल्पही महाराष्ट्रात येऊ द्यावा. ज्या प्रकल्पामुळे राज्याचे हित होत असेल पर्यावरणाचं संवर्धन राखलं जात असेल, असे प्रकल्प महाराष्ट्रात आलेच पाहिजेत, या मताचे आम्ही असल्याचेही अजित पवार म्हणाले.