प्रधानमंत्री आवास योजनेबाबत बँकांची उदासीनता असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 10:36 PM2017-10-13T22:36:41+5:302017-10-13T22:39:27+5:30
हुडकोच्या अधिकाºयांनी व्यक्त केली खंत : योजनेचे सर्वेक्षण ३१ आॅक्टोबरपूर्वी पूर्ण करा
आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.१३-प्रधानमंत्री आवास योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रथमच या प्रकल्पामध्ये सहकारी बँकांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र बँकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे,अशी खंत हुडकोच्या उप महाव्यवस्थापक वैजयंती महाबळे यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘सर्वांसाठी घरे-२०२२’ या योजनेच्या जिल्हा पातळीवरील उद्दष्टिपूर्तीसाठी नियोजन भवनात शुक्रवार दि.१३ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन खासदार ए. टी. पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, म्हाडाचे अधीक्षक अभियंता दिलीप मुगळीकर आदी उपस्थित होते.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेले सर्व्हेक्षणाचे काम सर्व नगरपालिकांनी येत्या ३१ आॅक्टोबर पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.वैजयंती महाबळे म्हणाल्या की, बँकांनी या योजनेकडे संधी म्हणून बघावे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील ४ हजार ४१ तर राज्यातील ३७२ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ५१ हजार २७७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जळगाव शहर महानगरपालिका- १८ हजार ६१, भुसावळ नगरपरिषद-७ हजार ३०४, अमळनेर - ३ हजार २१७, चाळीसगाव- ३ हजार ८६७, चोपडा- २ हजार ९७८, पाचोरा- २ हजार ६९१, जामनेर- २ हजार ११६, एरंडोल- १ हजार ४१९, धरणगाव- ८४७, पारोळा- १ हजार ६८०, रावेर- १ हजार १९३, यावल- १ हजार ६७०, सावदा, वरणगाव, भडगाव, फैजपूर प्रत्येकी ८४७ तर बोदवड नगरपंचायतीस ८४६ असे एकूण ५१ हजार २७७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे कानडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.