अमळनेर, जि.जळगाव : शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पालिकेत सत्ताधारी गटातून बंडखोर नगरसेवकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे पालिकेची परवानगी न घेता, अवैध पाणीपुरवठ्याचे कनेक्शन घेणाºया जीवनधारा कंपनीची यंत्रणा पालिकेने सील केली.शहरात पाण्याची टंचाई असताना नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती तथा माजी आमदार साहेबराव पाटील त्यांच्या वैयक्तिक राजकारणासाठी जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे सत्ताधारी गटातील नगरसेविका रत्नमाला साखरलाल महाजन, कमलबाई पीतांबर पाटील, शीतल राजेंद्र यादव, संगीता संजय पाटील, नूतन महेश पाटील, राधाबाई संजय पवार, प्रताप अशोक शिंपी, सुरेश आत्माराम पाटील, संतोष भगवान पाटील, घनश्याम जयंत पाटील, संजय महादू भिल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राजीनामा न दिल्यास प्रत्येक प्रभागातून मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी विरोधी गटाचे प्रवीण पाठक, श्याम पाटील, योगराज संदानशीव आदींनी भेट दिली.संतप्त नगरसेवकांनी सिंधी कॉलनी भागात जाऊन जीवनधारा प्रकल्पाला भेट दिली. त्यांनी मुख्याधिकाºयांना तिथे बोलावले होते. ‘जीवनधारा’कडून याआधी विहिरीतील पाणी शुद्ध व थंड करून ते नागरिकांना देत असे. मात्र, नंतर न.पा.च्या पाईपलाईनवरून अवैध नळजोडणी केल्याची तक्रार नगरसेवकांनी केली होती. दरम्यान, मुख्याधिकाºयांनी चौकशी केली असून स्थिती काय आहे हे जाणून न.पा.चे पाणी चोरून विकणाºया जीवनधारा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाºयांनी अभियंता हर्षल सोनवणे यांना दिले आहेत.या कारणावरून नगरसेवकांची खदखदपाण्याचे तिसरे आवर्तन मिळणार नाही हे नगराध्यक्षांना माहीत आहे, असे असतानाही त्यांनी उपाययोजना केली नाही. पाणीटंचाईच्या काळात शासनाकडे नवीन योजनेसाठी एकही ठराव पाठवला नाही. पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी जानेवारीपासून दोन दिवस वाढवण्यास सांगत होते. त्याचा विचार केला नाही. दुष्काळ असून, पाणीपुरवठा यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून १० ते १५ दिवसाआड नळांना पाणी येत आहे. तरीही नगराध्यक्षा एकही दिवस पालिकेत येत नाही. मुंदडा नगरच्या पाण्याच्या टाकीवरुन मंगरुळ गावाला पाणी देण्याचा ठराव मंजूर करून दिला. जीवनधारा या खासगी कंपनीला मुख्य जल वाहिनीवरून कनेक्शन देऊन तेथे ७० टक्के फील्टर केलेले पाणी वाया जात आहे. वैयक्तिक लाभासाठी अतिक्रमण रोखण्याचे चुकीचे ठराव करून सर्व नगरसेवकांचा बळी दिला. नगरसेवक स्वखर्चाने टँकर मागवून पाणी वाटप करत असून, पालिकेचे ट्रॅक्टर उभे करून ठेवणे, नगराध्यक्षांची पाण्याची एवढी बिकट परिस्थिती असतानाही एकही दिवस जळोद व कलाली येथे भेट नाही. यासह अनेक कारणे देत नगरसेवकांनी खदखद बाहेर काढली आहे.
अमळनेर पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून खुर्चीला हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 6:33 PM
पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, नगराध्यक्षा पालिकेत येत नाहीत. विकास कामांबाबत भेद केला जातो. या कारणास्तव सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ठळक मुद्देनगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा पाणी चोरणाºया जीवनधाराची यंत्रणा सील