खुनाच्या घटनेनं हादरलं अमळनेर! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 08:04 AM2022-09-09T08:04:59+5:302022-09-09T08:06:10+5:30
चारित्र्याचा संशय घेत ३५ वर्षीय विवाहित महिलेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत घडली.
जळगाव
चारित्र्याचा संशय घेत ३५ वर्षीय विवाहित महिलेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील मुंबई गल्लीत घडली. देविदास उर्फ सूर्यकांत आत्माराम चौधरी असे आरोपीचे नाव असून आरोपीने सुरुवातीला महिलेने आत्महत्या केल्याचे भासवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या योगिता चौधरी हीचा विवाह अमळनेर येथील देविदास उर्फ सूर्यकांत चौधरी याच्याशी झाला होता. देविदास उर्फ सूर्यकांत याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करतो मुलबाळ नसल्याने तो पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीला मारहाण करीत होता. तिला वारंवार माहेरून पैसे आण म्हणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत होता. दोन तीन दिवसांपूर्वी योगिता चलथान सुरत येथे मामाच्या घरी गेली असताना पतीने नातेवाईकांकडे तिची बदनामी सुरू केली होती म्हणून योगिता गैरसमज दूर करण्याकरिता पुन्हा पतीकडे परत आली होती.
८ रोजी योगीताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. तसेच ती खाली पडून आली असेही पतीने सांगून पोलिसात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर दिली होती. बचत गट वाले कर्जाचे पैसे मागणीसाठी तगादा लावत होते अशी अफवा शहरात पसरविण्यात आली होती. मात्र तिचा भाऊ दिनेश आत्माराम चौधरी व इतरांनी प्रत्यक्ष पाहिले असता योगीताच्या गळ्यावर सर्व बाजूने दोरी आवळल्याचे व्रण होते. गळ्यावर ओरखडल्याच्या खुणा होत्या. तर तिच्या नाकातून देखील रक्त येत होते. वर छताला कुठेच दोरी लटकलेली अथवा तुटलेली दिसली नाही योगीताचे प्रेत खाली पडले होते. बचाव करताना नखे लागली असावीत याची खात्री करण्यासाठी नखे तपासली असता ती वाढलेली नव्हती व चालूच कापलेली आढळून आली. तसेच योगिता वरून खाली पडून आली असे सांगितले जात होते मात्र वरून पडल्याने लागलेल्या काहीच जखमा अथवा चिन्हे दिसली नाहीत. त्यामुळे योगीताचा खून झाल्याची खात्री दिनेशला झाल्याने त्याने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने ९ रोजी पहाटे पती सूर्यकांत विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.