पाचोरा येथे आगीत रुग्णवाहिका जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:46 PM2021-05-09T16:46:37+5:302021-05-09T16:47:26+5:30
टायर फुटले व आगीने भडका घेत रुग्णवाहिकेच्या आतील भाग क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी जात मोठा भडका उडाला.
पाचोरा : येथील ग्रामीण रुग्णालयाची नादुरुस्त रुग्णवाहिका रविवारी सकाळी अकराच्या सुमारास अचानक जळून खाक झाल्याची घटना ग्रामीण रुग्णालय परिसरात घडली आहे. पेटत्या कचऱ्याने पेट घेतल्याने ही रुग्णवाहिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
याबाबत माहिती अशी की, येथील ग्रामीण रुग्णालयाची १०२ ही रुग्णवाहिका (एमएच-१९-एम-१२३) ही गाडी बरेच दिवसांपासून नादुरुस्त अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात उभी होती. या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले होते. रविवारी सकाळी हा कचरा सफाई कर्मचाऱ्याने पेटविला. तेव्हा उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेकडे कचऱ्याने पेट घेत सुरुवातीला रुग्णवाहिच्या चाकास आग लागली. त्यात टायर फुटले व आगीने भडका घेत रुग्णवाहिकेच्या आतील भाग क्षणार्धात आगीच्या भक्ष्यस्थानी जात मोठा भडका उडाला.
तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन बंब पाचारण करून आग आटोक्यात आणली. यावेळी रुग्णवाहिकेच्या संपूर्ण भाग जळून खाक झाला. रुग्णालयाचे वैद्यकीयअधिकारी डॉ.अमित साळुंखे हे हजर झाले.
दरम्यान, रुग्णालय परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी करून वृत्त प्रसिद्ध होऊनही पालिकेला जाग आली नाही. या परिसरात अद्यापही घाणीचे साम्राज्य आहे.
या ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर असून, ३० रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत. त्यांना ऑक्सिजन पुरविण्यात आला आहे. याच ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडरदेखील आहे. आग रात्रीच्या वेळी लागली असती अथवा आगीच्या लोळनी रुग्णालयाला स्पर्श केला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र सुदैवाने सकाळच्या वेळी ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला.