मिलिंद कुलकर्णीजनसंघाचे प्रचारक, पत्रकार, शेतकरी नेते, लोकप्रतिनिधी असा राजकीय प्रवास असलेले अनिल गोटे हे मुरब्बी आणि चाणाक्ष राजकारणी आहेत. महापालिका निवडणुकीचे निमित्त करुन भाजपाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाला त्यांनी आव्हान दिले आहे. हे आव्हान देताना मंत्री त्रिकुटांविषयी असलेला राग त्यांनी व्यक्त केला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा विषय उचलून भावनेला हात घातला आहे. आता भाजपा आपत्ती व्यवस्थापन कसे करते यावर महापालिका निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.धुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दिवसेंदिवस त्यात रंग भरत जाणार आहे, याची नांदी पहिल्याच टप्प्यात आली. भाजपामधील दोन गटांमध्ये संघर्ष होणार हे चित्र असले तरी एवढ्या टोकाला तो जाईल, असे निश्चितच वाटत नव्हते. पण आमदार अनिल गोटे यांनी ५० वर्षांच्या राजकीय अनुभव, चाणाक्षपणा याचा प्रत्यय देत धक्कातंत्राने भाजपाचे पक्षश्रेष्ठी आणि मंत्र्यांचे त्रिकुट यांची कोंडी केली आहे.अनिल गोटे हे अतिशय विचारपूर्वक पावले उचलत आहेत. भाजपाच्या नेतृत्वाला आव्हान देत असताना पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना ते चुचकारत आहेत. गोटे यांचे विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र हे महापालिका क्षेत्र असेच आहे. त्यामुळे भाजपाचा लोकप्रतिनिधी या नात्याने महापालिका निवडणुकीत पक्षाने विश्वासात घ्यायला हवे, अशी भूमिका मांडत त्यांनी जनतेमध्ये सहानुभूतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, पालक आमदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावला. व्यासपीठावरील फलकावर मोदी, शहा, फडणवीस, दानवे यांचे फोटो आवर्जून लावले. ज्येष्ठ नेते स्व.उत्तमराव पाटील यांच्या समाधीस्थळी कार्यकर्ता मेळावा घेतला. शिवतीर्थाशेजारी प्रचार कार्यालय सुरू केले. त्याठिकाणी सुमारे २०० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हे एक प्रकारे पक्षाला आव्हान होते. गिरीश महाजन यांचा ‘जामनेर पॅटर्न’ म्हणजे दुसऱ्या पक्षांमधील ‘इलेक्टीव मेरीट’चे उमेदवार पावन करून घेणे, हा असल्याने गोटे यांनी सावधपणे ‘कोरी पाटी’, सुशिक्षित, प्रामाणिक उमेदवार उभे करणार अशी भूमिका घेतली.पक्षशिस्तीच्या चौकटीत राहून अनिल गोटे सावधपणे सगळी कार्यवाही करीत होते. त्यांच्याविषयी तक्रारी पक्षश्रेष्ठींपर्यंत जात होत्या. परंतु, पक्ष त्याकडे दुर्लक्ष करीत होता. राष्टÑीय पातळीवर यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, राज्य पातळीवर नाना पटोले यांच्याकडे पक्ष ज्याप्रमाणे दुर्लक्ष करीत होता, तसेच गोटेंविषयी होत होते. परंतु, गोटे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सभेत जाऊन केलेला भाषणाचा प्रयत्न, महापौरपदासाठी स्वत:च्या नावाची केलेली घोषणा, आमदारकीचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय, भाजपाच्या मुलाखतींना समर्थकांना पाठविण्याची कृती, राज्यातील भाजपा आमदारांना खुले पत्र लिहून पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची मांडलेली कैफियत हे पक्षश्रेष्ठींच्यादृष्टीने अनपेक्षित होते. गोटे यांचे वेगळेपण याठिकाणी दिसून येते. अचूक टायमिंग साधण्यात ते पटाईत आहेत. त्यांच्या रणनीतीची कल्पना प्रतिस्पर्धी करु शकत नाही. स्थानिक आणि परका, निष्ठावान आणि आयाराम, मराठा आणि ओबीसी, गुंडगिरी आणि प्रामाणिकपणा असे मुद्दे प्रचारात आणून भाजपाच्या अडचणीत गोटे यांनी भर घातली आहे. आमदारकीच्या राजीनाम्याचा निर्णय घेऊन गोटे यांनी आता पुढचे पाऊल टाकले आहे. खुल्या पत्रातून त्यांनी त्यामागील भूमिका विशद करून धुळ्याचा विषय राज्यस्तरावर नेला आहे. त्यामुळे आता समझोता होण्याची शक्यता कमी वाटते.आता खरी कसोटी भाजपाची आहे. गुंडांना पक्षात स्थान देण्याचा मुद्दा उचलून गोटे यांनी मंत्री त्रिकुटाला अडचणीत तर आणलेच शिवाय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही या कृतीच्या समर्थनासाठी लक्ष्य केले आहे. जामनेर, जळगावात गिरीश महाजन यांना एवढा टोकाचा विरोध झालेला नव्हता. धुळ्यात स्वपक्षीय लोकप्रतिनिधीचा विरोध ते कसा परतावून लावतात, हे पुढील काळात कळेल. परंतु, भाजपाच्या प्रतिमेला धक्का लावण्यात गोटे यांना यश आले आहे, असे म्हणावे लागेल.अनिल गोटे यांचे आव्हान असले तरी भाजपाचे संघटनात्मक कार्य, लगतच्या जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची फौज, सक्षम आर्थिक बाजू, केंद्र व राज्य सरकारची कामगिरी या बळावर भाजपा सक्षम पर्याय आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष या स्थितीचा लाभ घेण्याच्या स्थितीत नसल्याने भाजपाच्या दोन गटांमध्येच हा सामना रंगणार असल्याची स्थिती आहे.नाशिक, जामनेर, पालघर, जळगाव निवडणुकांमधील विजयाचे शिल्पकार असलेले ‘संकटमोचक’ मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल या त्रिकुटाकडे धुळे महापालिकेची धुरा सोपविण्यात आली आहे. चार वर्षांपासून गोटे आणि भामरे, रावल या गटामध्ये अंतर्गत संघर्ष सुरू होता. पक्षाला दूर ठेवत गोटेंनी प्रचार कार्यालय उघडले, इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; मात्र पक्षाने दुर्लक्ष कायम ठेवले. अखेर कडेलोट झालाच.गोटेंना वेगळा न्याय का?खान्देशातील जळगाव आणि धुळे या महापालिका निवडणुका तीन महिन्यांच्या अंतराने होत आहेत. जळगावची प्रभारी म्हणून जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडेच होती. पण निवडणूक प्रमुख म्हणून जळगावचे आमदार आणि महानगर जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. धुळ्यात गोटे यांना विश्वासात घेऊन, काही जागा देऊन एकोपा ठेवता आला असता. गोटेंना वेगळा न्याय का, हा प्रश्न आहेच.
अनिल गोटेंच्या धक्कातंत्राने भाजपाची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 9:40 PM