प्राणी दिन विशेष- पाटणादेवी जंगलात प्राण्यांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:06 PM2020-10-03T23:06:45+5:302020-10-03T23:08:16+5:30
मानवी आक्रमणामुळे वन्यपशूंच्या रहिवासात अडथळा येत असल्याची बहुतांशी उदाहरणे यंदा कोरोनामुळे अपवाद ठरली आहेत.
जिजाबराव वाघ
चाळीसगाव : मानवी आक्रमणामुळे वन्यपशूंच्या रहिवासात अडथळा येत असल्याची बहुतांशी उदाहरणे यंदा कोरोनामुळे अपवाद ठरली आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून पर्यटनस्थळे व जंगलसफरीचीही टाळेबंदी असल्याने प्राण्यांना मुक्त संचार करण्याची संधी मिळाली आहे. पाटणादेवी जंगलातही सद्य:स्थितीत प्रवेशबंद असल्याने प्राण्यांचा मुक्तसंचार सुरू आहे.
चाळीसगाव शहराच्या १८ कि.मी. अंतरावर नैऋत्यला पाटणादेवीचा हिरवा शालू परिधान केलेला निसर्गरम्य परिसर आहे. येथे दाटवृक्षराजी सोबतच दुर्मिळ वनस्पती आहेत. जंगल परिसराला सातमाळा डोंगररांगांची तटबंदी आहे. याच डोंगररांगांमधून झेपावत येणारे लहान-मोठे शुभ्रधवल धबधबे पावसाळ्यात या सौदर्याला चार चाँद लावतात. यंदा मात्र कोरोनामुळे पाटणादेवी दर्शनासह जंगल सफरीला प्रवेश बंद आहे. यामुळे जंगल परिसरात प्राण्यांना वावरण्यास मुक्त वाव मिळत आहे.
एकूण सहा हजार ५०० हेक्टर जंगल परिसरात मोठ्या संख्येने प्राणी संपदा आहे. दुर्मिळ पक्षांचा अधिवास आणि वनसंपदेमुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी होत असते. यावर्षी मात्र वन्यपशूंना कोणताही संसर्ग होऊ नये. यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. मार्चपासून जंगलात फिरण्यास मनाई केली गेली असून चंडिकादेवीचे दर्शनही बंद आहे.
पाटणादेवी जंगल परिसराला जोडूनच गौताळा अभयारण्याचा परिसर आहे. पाटणादेवीच्या जंगलात वन्य प्राण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नसाखळी उपलब्ध असून उन्हाळ्यात १९ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
११ बिबटे
पाटणादेवी जंगल परिसरात ११ बिबटे असल्याची नोंद प्राणी गणनेत घेण्यात आली आहे. याबरोबरच नीलगाय, मोर, हरीण, माकडे, दीडशेहून अधिक रानडुकरे, विविध पक्षी आहेत, अशी माहिती चाळीसगाव वनविभागाचे वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी एम. डी.चव्हाण यांनी दिली.