देवेंद्र मराठे यांची मागणी : कोरोना रुग्णालयांचा परिसरही निर्जंतुक करण्यात यावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व जनरल प्रॅक्टिशनर (सामान्य चिकित्सक)या खाजगी डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची अँटीजन कोरोना चाचणी सुरू करुन, ती बंधनकारक करावी. तसेच खबरदारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांलयांचा परिसर दररोज निर्जंतुक करण्यात यावा, अशी मागणी जळगाव जिल्हा एनएसयुआय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
सर्वसामान्य गरीब घरातील नागरिक कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर,कोविड रुग्णालया ऐवजी शहरातील नागरिक जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांकडे गर्दी करू लागले आहेत. त्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपातील उपचार घेऊन शहरांमध्ये वावरत आहे. त्यामुळे इतर नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, शहरातील सर्व जनरल प्रॅक्टिशनर कडे येणाऱ्या रुग्णांची अँटीजन चाचणी बंधनकारक करावी, तसेच जिल्हा प्रशासनाने शहरातील काही खाजगी रुग्णालयांनाही कोरोना रुग्णालय म्हणून परवानगी दिली. परंतु ही रुग्णालये रहिवास असलेल्या भागांमध्ये आहे. रुग्णालयाच्या परीसरातील नागरीकांनाही कोरोना संसर्ग होण्याची शक्यता असल्याने या परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करण्यात यावे, या दोन मागण्या देवेंद्र मराठे यांनी करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.