संजय पाटीलअमळनेर : शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कठोर पावले उचलली. त्याचे सकारात्मक परिणामही दिसताहेत. परिणामी स्वच्छता अभियान अंतर्गत अमळनेर शहराला तीन तारांकित दर्जा मिळून शहर हगणदारीमुक्त घोषित झाले आहे. देशाच्या पश्चिम विभागात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी अमळनेर नगरपरिषदेचा दहावा क्रमांक आला आहे.शहराची लोकसंख्या ९५ हजार ९९४ आहे. शहरात २३० पुरुष सिट व ३०० महिला सीटचे सार्वजनिक शौचालय अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आले आहेत. याशिवाय ४,५१५ जणांंना वैयक्तिक शौचालय अनुदान देण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी ४३६२ जणांंना अनुदान देऊन त्यांनी वैयक्तिक शौचालय बांधले आहेत. शासनाच्या अनुदानीव्यतिरिक्त नगरपरिषदेनेदेखील प्रत्येकी ५ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान ३२६९ जणांना दिले आहे. उर्वरित लोकांनी अनुदान घेऊनही बांधले नसल्याने ते परत मागवण्यात आले होते .माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, तत्कालिन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिºहाडे यांच्यासह नगरसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी लक्ष घालून पहाटे आणि रात्री अचानक छापे टाकून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. अनेकांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात दंडदेखील भरायला लावला. त्यामुळे नागरिकांना शौचालयाची सवय लागली. शहर दुर्गंधीमुक्त झाले. नदी काठ परिसर स्वच्छ करून झाडे लावण्यात आली. शौचालयांना रंगरंगोटी करून सुशोभिकरण करण्यात आले. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागली. यामुळे शहरातील नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले. त्यांचा दवाखान्याचा खर्च वाचून आर्थिक बचत व शरीर निरोगी राहिले.काही अपवाद म्हणून मोजके समाजकंटक लोक उघड्यावर शौचास जातात. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. उर्वरित लोकांना अनुदान देऊन त्यांच्याकडून वैयक्तिक शौचालय बांधून घेण्यात येतील. - डॉ.विद्या गायकवाड, मुख्याधिकारी, नगरपरिषद, अमळनेर
अमळनेरात हगणदरीमुक्तीत कठोर पावलांचे सुयोग्य परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:10 PM
शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने कठोर पावले उचलली.
ठळक मुद्देरियालिटी चेक अमळनेरचा राज्यात व देशाच्या पश्चिम विभागात दहावा क्रमांक