दहा रुपये कमी करून बनवले एप्रिल फुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:13 AM2021-04-03T04:13:22+5:302021-04-03T04:13:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात वाढलेल्या इंधनदरावर दहा रुपये कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात वाढलेल्या इंधनदरावर दहा रुपये कमी करून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र हा दिलासा नाही तर सामान्यांची फसवणुक असल्याची भावना निर्माण होत आहे. सहा महिन्यात तब्बल दोनशे रुपयांनी वाढ केली. मात्र कमी करताना फक्त दहा रुपयेच कमी केले. त्यामुळे हे एक एप्रिलला केलेले एप्रिल फुल तर नाही, असे गृहिणींना वाटत आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने इंधन दर सातत्याने वाढवले होते. त्यामुळे कोरोनाच्या अडचणीच्या काळात महागाई वाढली होती. घरगुती गॅस सिलिंडरचे दर या काळात तब्बल सव्वादोनशे रुपयांनी वाढले होते. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले होते. आधीच कोरोनाच्या काळात लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपल्या रोजगाराला मुकावे लागले होते. लहान व्यापारी अडचणीत आले होते. त्यानंतर च्या काळात सरकारकडून या दरांमध्ये कपात करून नागरिकांना काही अंशी का होईना, पण दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र येथेही सरकारने त्यांची निराशाच केली होती. आता सव्वादोनशे रुपये वाढवून दहा रुपये कमी केले आहे. ही सरकारने केलेली चलाखी असल्याची भावना गृहिणी व्यक्त करत आहेत.
कोट - कोरोनाच्या काळात सरकारने दोनशे रुपयांनी गॅस वाढवला आहे. आता पुन्हा दहा रुपये कमी करून काय मिळवणार आहेत. सरकारने आम्हाला एप्रिल फुल करू नये. दर सामान्यांच्या नियंत्रणात असावेत
- स्नेहा पाटील.
महागाईने आधीच कंबरडे मोडले आहे. उत्पन्न कमी झाले आहे. नुसते दहा रुपये कमी करून सरकारला काय मिळणार आहे काय माहित. किमान आमच्याकडे चार पैसे जास्त शिल्लक राहतील, एवढे तरी कमी करावेत
- अनिता जोहरे
योजनेत गॅस दिला, आता पुन्हा एखादी योजना आणून कमी दरात गॅस सिलिंडर द्यावा. चुल मोडली आणि गॅस आणला आता गॅससाठी दर महिन्याला एवढे पैसे आणायचे कसे
- गायत्री सपकाळे
इंधन दर
नोव्हेंबर २०२० - ५९९.५०
डिसेंबर २०२० - ६४९.००
जानेवारी २०२१ - ६९९.५०
फेब्रुवारी २०२१ - ७२४.५०
मार्च २०२१ - ८२४.५०
एप्रिल २०२१ ८१४.५०