फोटो
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तापी पाटबंधारे कार्यालयात येऊन पैशाची मागणी केल्याची सुरक्षा रक्षकांनी केलेली तक्रार फेटाळून न लावल्याने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रामदास इंगळे (वय ५२, रा. शिव कॉलनी) यांनी गुरुवारी सायंकाळी तापी पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हा पेठ पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी इंगळे यांना ताब्यात घेतले आहे.
प्रमोद इंगळे यांनी पोलीस ठाण्यात पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, तापी पाटबंधारे विभागाच्या काही सुरक्षारक्षकांनी गेल्या महिन्यात आपल्याविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. इंगळे हे कार्यालयात येऊन पैशांची मागणी करतात, पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देतात, असे या अर्जात म्हटले होते. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी केलेल्या आरोप मान्य नसल्यामुळे आपण देखील एक तक्रार अर्ज केला. सुरक्षारक्षकांचा तक्रार अर्ज फेटाळावा अशी मागणी अधिक्षक अभियंता प्रशांत माेरे यांच्याकडे केली होती. यासाठी गेल्या महिन्यात ते कार्यालयाच्या बाहेर उपोषणासही बसले होते. असे करुनही त्यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे गुरुवारी इंगळे यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या जिल्हापेठ पोलिसांनी इंगळे यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.