जळगाव : जिल्ह्यात एक पिक लागवडीबाबत एक बाब जाणवली ती म्हणजे त्याच-त्याच पीकांची वर्षानुवर्षे लागवड केली जात असते. यावर उपाय म्हणून १५ तालुक्यात प्रात्यक्षिके घेऊन नवीन पीक घेण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’भेटीप्रसंगी दिली.डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर प्रथमच ‘लोकमत’च्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील शहर कार्यालयास भेट दिली आणि जिल्ह्याशी संबंधीत विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली. त्यांचे स्वागत वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा व सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी केले. त्यांच्याशी झालेली चर्चा प्रश्नोत्तर स्वरूपात पुढीलप्रमाणे...प्रश्न : लोकसभेची निवडणूक नुकतीच आटोपली. आपला या निवडणुकीबाबत अनुभव काय?ढाकणे : निवडणुकीपूर्वीच प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या झाल्या व नवीन अधिकारी आले. मात्र मोजक्या कालावधीत सर्वांनी अतिशय उत्तम व पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविली. कोणतीही शंका नको, चूक नको असे प्रयत्न होते. ज्या ठिकाणी त्रुटी झाली तेथे भडगाव तालुक्यात फेरमतदान घेतले. हा जिल्हादेखील अतिशय शांत आहे. सर्वांचे सहकार्य मिळाले.प्रश्न : जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी काय उपाययोजना आहेत ?ढाकणे : टंचाईस्थितीचा रोज आढावा घेत असतो. अनेक वर्षानंतर एवढी भीषण स्थिती आहे. जिल्ह्यात सध्या १६१ टॅँकर सुरू आहेत. वाघूर, गिरणात पाणी आहे. एरंडोल, चोपडा, अमळनेर, भुसावळ येथे नव्याने नियोजन केले. काही बंद योजनांबाबत नियोजन करून त्या सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. टॅँकरने पाणी पुरवठा होतोय पण तो योग्य पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा आहे.प्रश्न : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे, गतीसाठी काय प्रयत्न आहेत. ?ढाकणे : औरंगाबादकडून येणाºया रस्त्याने सर्वाधिक त्रास होत असतो. तरसोद ते फागणे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तरसोद ते चिखली दरम्यानचे काम सुरू आहे. जळगावातून जाणाºया महामार्गाच्या चौपदरीकरणाचे टेंडर झाले आहे. गतीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.प्रश्न : वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर आहे, ती रोखण्यासाठी प्रयत्न काय?ढाकणे : गिरणा नदीच्या वाळूला सर्वाधिक मागणी आहे. तेथूनच जास्त चोरी होते. अगदी लिलावात कोणी भाग घेऊ नये यापासून रॅकेट कार्यरत आहे. यावर उपाय केले जात आहेत. पोलीस अधीक्षक व आपण एकत्रित स्वतंत्र यंत्रणा असावी या दृष्टीने नियोजन करत आहोत. जप्त केलेली असंख्य वाहने पडून आहेत. आर.टी.ओ.च्या मदतीने मुल्यांकन करून या वाहनांचा भंगार म्हणून लिलाव केला जाणार आहे. दर तीन महिन्यांनी हा लिलाव होईल.तिच तिच पिके वर्षानुवर्षेजिल्ह्यात आपण फिरत असताना तिच, तिच पिके वर्षानुवर्षे घेतली जात असल्याचे लक्षात येते. राज्यात काही जिल्ह्यात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्याच पद्धतीने १५ तालुक्यांसाठी आपण नियोजन करत आहोत. पारंपारीक पिक घेण्यापेक्षा त्यात बदल करणे हे केव्हाही फायद्याचे ठरू शकेल. शेतांमध्ये प्रात्यक्षिक करून लोकांमधून जागृती केली जाईल.ही मानसिकता बदलावीग्राम पंचायतींच्या वीज बिलाचा प्रश्न सर्वत्र बिकट आहे. वीज बिल भरले जात नाही म्हणून पुरवठा बंद केला जातो. परिणामी दुसरीकडचे दुषित पाणी पिले जाते. दवा खान्याचे बिल नागरिक भरतात पण ग्रा.पं. कर भरत नाही, ही मानसिकत बदलली पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पीक पद्धतीत बदल करण्यासाठी प्रयत्न - जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 7:40 PM