अमळनेर : स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अमळनेर शहरात ऐतिहासिक दगडी दरवाजावर (अमळनेरची वेस) वर तत्कालीन नगराध्यक्ष रंगराव आप्पा देशमुख यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. या रम्य आठवणी आजही ताज्याच वाटत आहेत.
क्रांतिकारकांच्या अखंड परिश्रमामुळे अखेर इंग्रजाना भारताला स्वातंत्र्य द्यावे लागले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र होईल असे जाहीर झाले. त्यादिवशी अमावास्या होती; म्हणून मध्यरात्री तिरंगा फडकविण्याचे आदेश आले. त्यावेळी मो. द. ब्रह्मे हे अमळनेर तालुका काँग्रेसचे चिटणीस होते. त्यांच्या हस्ते १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री अमळनेरच्या ऐतिहासिक दगडी दरवाजावर श्रीमंत प्रतापशेटजी, मो. धों. पुसाळकर वकील, शंकर शिंपी, फुलचंद पहाडे, खुशाल यादव, रंगराव देशमुख, हैदरखाँ हयातखाँ पठाण इत्यादी अनेक कार्यकर्ते व हजारो नागरिकांच्या समक्ष स्वातंत्र्याचा पहिला ध्वज फडकविण्यात आला. १५ ऑगस्टला सायंकाळी टाऊन हॉलच्या पटांगणावर नगराध्यक्ष रंगराव देशमुख
यांच्या उपस्थितीत मो. द. ब्रह्मे यांनी नागरिकांना स्वातंत्र्याची शपथ दिली.
नंतरच्या गोवा मुक्ती संग्रामातदेखील अमळनेरने आपला वाटा उचलला आहे. रमेश करमरकर, पूना झगा मराठे, सुकलाल चौधरी, रसिक गांधी, रामनिवास पुरोहित, श्रीनिवास देवरे, शेख हुसेन शेख बशीर अशी अनेक नावे त्याबाबत सांगता येतील.