लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या स्मार्ट ग्राम अर्थात तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारांमध्ये यंदा विभागून प्रत्येकी दोन गावांची अशा तीन वर्षातील सहा गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांना प्रत्येकी २० लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईत एक महत्त्वाची बैठक असल्याने या पुरस्कार वितरणाचा १६ फेब्रुवारीचा मुहूर्त मात्र टळला आहे.
स्वच्छता, पाणीपुरवठा, शाळांमधील सुविधा याबाबबींत उत्कृष्ट काम असणाऱ्या जिल्ह्यातील तालुकास्तरावर ४५ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांना प्रत्येकी दहा लाख रूपये मिळणार आहे. पुरस्कार वितरण हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वेळ मिळाल्यानंतर २२ किंवा २३ फेब्रुवारीला होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरापूर्वी या गावांची समितीकडून पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार गावांना शंभरपैकी गूण देण्यात आले होते.
ही गावे २० लाखाचे मानकरी
अमळनेर तालुक्यातील एकतास, चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रूक, रावेर तालुक्यातील चिनावल, बोदवड तालुक्यातील मानमोडी, पाचोरा तालुक्यातील वडगावकडे, भुसावळ तालुक्यातील खंडाळा या गावांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.
ही गावे तालुकास्तरावर चमकली
सुंदरपट्टी ता. अमळनेर, अंजनिवहिरे ता. भडगाव, साकेगाव ता. भुसावळ, देवळी ता. चाळीसगाव, घुमावल ता. चोपडा, अंजनविहिरे ता. धरणगाव, उत्राण गु.ह ता. एरंडोल, सावखेडे खु ता. जळगाव, पाळसखेडा बुद्रूक ता. जामनेर, कर्की ता. मुक्ताईनगर, द. सबगव्हाण ता. पारोळा, रोझोदा ता. रावेर, उंटावद ता. यावल, बात्सर ता. भडगाव, मुक्तळ ता. बोदवड, ब्राह्मण शेवगे ता. चाळीसगाव, अकुलखेडा ता. चोपडा, रोटवद ता. धरणगाव, रवंजे बुद्रूक ता. एरंडोल, तरसोद ता. जळगाव, मोराड ता. जामनेर, पिंप्री नांदू ता. मुक्ताईनगर, बांबरूड प्र. बो ता. पाचोरा, देवगाव ता. पारोळा, भाटखेडा ता. रावेर, म्हैसवाडी ता. यावल, दहिवद ता. अमळनेर, गडगाव ता. भडगाव, कठोरे खुर्द ता. भुसावळ, साळिसंगी ता. बोदवड, चहार्डी ता. चोपडा, सोनवद ता. धरणगाव, खर्ची बुद्रूक ता. एरंडोल, जळगाव खुर्द ता. जळगाव, देऊळगाव ता. जामनेर, कोथळी ता. मुक्ताईनगर, निपाणे ता. पाचोरा, दळवेल ता. पारोळा, नायगाव ता. यावल ही गावे तालुकास्तरावर प्रथम आली असून त्यांना प्रत्येकी दहा लाखांचा निधी मिळणार आहे.