लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र सरकारने इंधन दरात आणि राज्य सरकारने वीजबिल आणि खाद्य तेलात भाववाढ केल्याच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टी व महिला आघाडीतर्फे मंगळवारी सकाळी रिक्षा, चारचाकी वाहनांना धक्का मारो आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या गाड्यांना धक्का मारण्यात आला.
आंदोलकांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले. यावेळी आंदोलकांनी वाढत्या महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील केली. तसेच सरकारला महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करण्याचा इशारादेखील दिला. या मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ करण्यात आली.
या मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, भारत विद्यार्थी युवा व बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, मुलनिवासी महिला संघ यांसारख्या १७ संघटनांनी आपला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व हारून मन्सुरी, जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, कार्याध्यक्ष अलीम शेख, विजय सुरवाडे, महिला आघाडीच्या सुनीता पवार, संध्या कोचुरे यांनी केली आहे. प्रास्ताविक इरफान शेख, राजेंद्र खरे यांनी केले. सुभाष सुरवाडे यांनी आभार मानले.
यशस्वितेसाठी युवा अध्यक्ष विनोद अडकमोल, रवींद्र वाडे, प्रमोद पाटील, सुनील शिंदे, अजय इंगळे, इरफान शेख, रियाज पटेल, खुशाल सोनवणे, रहीम तांबोळी, सुभाष सुरवाडे, विजय साळवे, संगीता देहाडे, राजश्री अहिरे यांनी परिश्रम घेतले.