केळी भावाला सुलतानी संकटाने पछाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:35 AM2021-09-02T04:35:17+5:302021-09-02T04:35:17+5:30
यावर्षी मृग बहार केळी कापणीच्या अगदी सुरुवातीपासून काहीसा समाधानकारक भाव मिळत होता. मात्र, गत आठवड्यापासून भावात कमालीची पातळी गाठत ...
यावर्षी मृग बहार केळी कापणीच्या अगदी सुरुवातीपासून काहीसा समाधानकारक भाव मिळत होता. मात्र, गत आठवड्यापासून भावात कमालीची पातळी गाठत शेतकऱ्यांना रडकुंडीस आणून सोडले आहे. सहाशे ते सातशे रुपयांची पातळी सोडून व्यापारी पुढे सरकत नाहीत, तर काही शेतकरी भावात होणारी गळचेपी सहन करून कापणीस तयार झाला तरी पिकल्याचा बहाणा करून व्यापारी तोंड फिरवून घेत आहेत. या कृत्रिम बहाण्याने मागणीत घट दाखवून भावात खिशाला कात्री लावण्याचे काम केले जात आहे.
...तर केळी झाडावर पिकणारच
केळीची कापणी उशिरा होत असल्यामुळे फळाचे आयुष्य संपताच फळ पिकणे नैसर्गिक आहेच. केळीची उचल होत नसल्यामुळे शेतात तुंबून आहे. त्यामुळे केळीवर करपा अथवा व्हायरस असल्याचा कांगावा करून पिळवणूक केली जात आहे.
वास्तविक पाहता आता केळीची आवक जेमतेम आहे. कारण केळी बागा ८० टक्के खाली झालेल्या आहेत. त्यामुळे मागणीच्या पटीत आवकची तुलना करता येणार नाही.