ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- भूसंपादनाचे पैसे संबंधित शेतक-यांना न दिल्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा बँकेतील करंट खाते न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी सिल करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जि. प. ची नामुष्की झाली असून त्यांच्या विविध आर्थिक व्यवहारांना ‘ब्रेक’ लागला आहे. या प्रकरणाबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुरंगी आणि जामनेर तालुक्यातील शहापूर येथील जमीनी पाटबंधारे विभागाने भुसंपादन केल्यानंतरही जिल्हापरिषदेने जमिनीच्या मोबदल्यांची 1 कोटी 66 लाख रुपये इतकी रक्कम बरेच दिवस होवूनही संबंधित शेतक-यांना दिलीच नाही. यापैकी कुंरगी येथील 27 लाखांच्या वसुलीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हापरिषदेचे हे बँक खाते सील केले असल्याची माहिती शेतक-यांचे वकील अॅड. एन. आर. लाठी यांनी दिली. हे आदेश 4 दिवसांपूर्वी दिले होते तर त्यावर शुक्रवारी 12 रोजी कार्यवाही झाली. यामुळे चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे पगार, कंत्राटदारांचे धनादेश, पेन्शनचे व्यवहार आदींना अडसर निर्माण झाला आहे. या थकीत मोबदल्यासाठी यापुर्वीही न्यायालयाच्या आदेशानुसार सिंचन विभागातील संगणक तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे वाहन जप्तीची कारवाई झाली होती. त्याचवेळी बँक खाते सील करण्याचा इशारा अॅड. लाठी यांनी दिला होता. मात्र मुदत देऊनही दीड महिना उलटला तरी रक्कम देण्यास जिल्हापरिषद प्रशासनाने टाळाटाळ केल्याने ही कारवाई झाली. सील केलेल्या खात्यात सुमारे 17 कोटीची रक्कम शिल्लक असुन त्यातुन पात्र लाभार्थांना रक्कम अदा केली जाणार असून या खात्यातील काढण्याचा निर्णय 15 जानेवारीला होणार असल्याचेही लाठी यांनी सांगितले. दोन-तीन दिवसात पैसे मिळणार शेतक:यांना त्यांच्या हक्काचे पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहेच. ही देणी अदा करण्यासाठी जि. प. तर्फे सरकारकडे पैशाची मागणी केली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार दोन-तीन दिवसात दीड कोटी रुपये मिळणार असून हा विषय तेव्हा लगेच मार्गी लावला जाईल, अशी माहिती जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.जिल्हाधिका-यांचे वाहन होणार जप्तमुंदखेडा तसेच पातोंडा येथील 80 लोकांचेही भूसंपादनाचे 54 कोटी घेणे असून या प्रकरणातह तापी महामंडळ, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीचे आदेश गुरुवारी काढले असल्याची माहितीही अॅड. लाठी यांनी दिली. यानुसार तीन- चार दिवसात जिल्हाधिकारी यांची कार जप्त करण्यात येणार आहे. तसेच इतर दोन्ही कार्यालयातही जप्तीची कारवाई केली जाईल, असेही लाठी यांनी सांगितलेर्.