गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:19 PM2019-08-05T13:19:28+5:302019-08-05T13:20:12+5:30
पोलीस महानिरीक्षक : व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला आढावा
जळगाव : आगामी गणेशोत्सव, बकरी ईद व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी आतापासूनच नियोजन करुन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्याच्या सूचना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी दिल्या आहेत.
शनिवारी सायंकाळी त्यांनी नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्याचा दोरजे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.
जळगावहून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सचिन गोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह सर्व उपअधीक्षक या आढावा बैठकीला उपस्थित होते.
आगामी गणेशोत्सव ध्वनीप्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
आतापासूनच सार्वजनिक मंडळांचे प्रबोधन करावे, गुन्हे दाखल असलेल्या मंडळांची दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल करा. तसेच विधानसभा निवडणुक तोंडावर आल्याने कायदा व सुव्यवस्था शांततेत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत.
सराईत गुन्हेगारांना तडीपार करा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आजी-माजी नगरसेवक, राजकीय-सामाजिक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जातीय दंगली टाळण्यासाठी खबरदारी घ्या
जातीय दंगली होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरफोडी, चोरीचे गुन्हे वाढू लागले आहेत. ते रोखण्यासाठी जिल्ह्यात रात्रगस्तीचे प्रमाण वाढवा. प्रलंबित गुन्हे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा, आदी सूचना दोरजे यांनी केल्या. जळगाव येथे गणेशोत्सव काळात वादाची पार्श्वभूमी आहे. यंदा कोणताही वाद होणार नाही, त्यासाठी संशयित लोकांवर आतापासूनच नजर ठेवून आवश्यक असलेल्यांना जिल्ह्यातून हद्दपार करावे तसेच बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.