गाळेधारकांच्या साखळी उपोषणला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:22 AM2021-06-16T04:22:16+5:302021-06-16T04:22:16+5:30
जळगाव : महापालिकेच्या मालकीच्या अव्यावसायिक मानल्या जाणाऱ्या १६ मार्केटमधील गाळेधारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले ...
जळगाव : महापालिकेच्या मालकीच्या अव्यावसायिक मानल्या जाणाऱ्या १६ मार्केटमधील गाळेधारकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह प्रमुख गाळेधारक मंगळवारी सकाळी पहिल्या टप्प्यात सहभागी झाले होते.
गाळेधारकांकडून महापालिकेने अवाजवी भाडेवसुली करू नये, या मागणीसाठी १६ व्यापारी संकुलतील व्यापारी एकत्र आले आहेत. त्यांच्या जळगाव शहर मनपा मार्केट गाळेधारक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. मंगळवारी त्याचा पहिला दिवस होता. त्यात सकाळी ९ वाजता आंदोलकांनी पिंप्राळा येथील एकमुखी दत्त मंदिरात दर्शन घेतले त्यानंतर सकाळी ११ वाजता साखळी उपोषणाला सुरुवात केली. त्यात पहिल्या टप्प्यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ हे सामील झाले. त्यांनी दुपारी २ पर्यंत उपोषण केले. त्यानंतर दुपारी २ वाजता संजय पाटील, पंकज मोमाया, वसीम कादरी, हेमंत परदेशी हे सहभागी झाले होते. तर सुरेश पाटील, रिजवान जहागीरदार, रमेश तलरेजा, संजय अमृतकर यांनीही हजेरी लावली.
बुधवारी वालेचा मार्केटमधील व्यापारी करणार उपोषण
गाळेधारक संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी आंदोलन केले. आता बुधवारपासून दर दिवशी एका मार्केटमधील गाळेधारक उपोषण करणार आहे. त्यात बुधवारी वालेचा मार्केटमधील गाळेधारक आंदोलन करतील. तसेच मागण्या मान्य न झाल्यास पुढे आंदोलनाचे स्वरूप बदलणार आहे. पुढे लवकरच थाळी बजाव आंदोलन, अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारादेखील गाळेधारकांनी दिला आहे.