शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:20+5:302021-04-11T04:15:20+5:30

कोरोना परिणाम : पुन्हा लॉकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजूर गावाकडे होताहेत रवाना जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा ...

Better a poor horse than no horse at all | शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं

Next

कोरोना परिणाम : पुन्हा लॉकडाऊन लागल्याने परप्रांतीय मजूर गावाकडे होताहेत रवाना

जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने पुन्हा महिन्याभराचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे उद्योग-धंदे बंद राहणार आहेत. त्यामुळे आमचे कामही बंद राहणार आहे. तसेच काम-धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं. त्यामुळे आम्ही जळगावहून आमच्या गोरखपूर या गावी जात असल्याची माहिती या परप्रांतीय बांधवांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

गेल्या महिनाभरापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, दररोज हजारो रुग्ण जळगाव जिल्ह्यात आढळून येत आहेत. तर राज्यभरात हीच परिस्थिती असल्याने चार दिवसांपासून राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या उद्योग-व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. अखेर परप्रांतीय बांधवांनी शहरातील बाजारपेठा बंद असल्याने गावी जाण्याला पसंती दिली असून, जळगावात विविध ठिकाणी काम करणारे परप्रांतीय मजूर रेल्वेने गावाकडे परतताना दिसून येत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या परप्रांतीय बांधवांना गावी जाण्यासाठी भुसावळ येथून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

परप्रांतीय बांधवांच्या प्रतिक्रिया

जळगावात एका हॉटेलवर मी कामाला आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद राहणार आहे. त्यामुळे मी या ठिकाणी राहण्यापेक्षा कुटुंबासह गोरखपूरला घरी जात आहे. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर पुन्हा येणार आहे.

- दीपक कश्यप.

एका बांधकामाच्या ठिकाणी मी कामाला आहे. काम सुरू असले तरी कोरोनामुळे जळगावात राहणे भीतीचे वाटत आहे. त्यामुळे गावाला जात आहे. गावाला शेती असून, गावात एखादा लहान व्यवसाय करेन. कोरोना संपल्यानंतर पुन्हा जळगावला येण्याचा विचार करेन.

- दिनू साहेब

पाळधीला एका रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी मी कामाला होतो. सध्या कोरोनामुळे काम बंद आहे. जळगावात राहून दुसरे काम काय शोधणार? त्यामुळे सध्या गावाला जात आहे. गावाला शेती नाही. मात्र, काहीतरी छोटे-मोठे काम शोधेन.

- आशिष यादव,

इन्फो :

बिहार, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल मार्गांवर मोठी गर्दी

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने जळगाव शहर व परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर गावाकडे परतत आहेत. यात बिहार राज्यातील मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

- तसेच उत्तर प्रदेशमधील गोरखपूर, मेरठ, लखनऊ व गाझियाबाद या ठिकाणी जाणाऱ्या परप्रांतीय बांधवांची स्टेशनवर मोठी गर्दी आहे. शहर व परिसरात आपल्या कुटुंबासह राहणारे नागरिक आपल्या कुटुंबासह पुन्हा गावाकडे परतत आहेत. यात जळगावहून गाड्यांची संख्या कमी असल्याने या प्रवाशांना भुसावळ येथून गाड्या पकडाव्या लागत आहेत.

- परप्रांतीय बांधवांना घेऊन जाणाऱ्या या गाड्या मुंबई येथूनच प्रवाशांच्या गर्दीने फुल्ल होऊन येत आहेत. परिणामी, जळगाव व भुसावळ येथून चढणाऱ्या प्रवाशांना गाडीत जागा मिळेना झाले आहे. तिकीट आरक्षण करूनही या प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागत असून, गर्दीमुळे रेल्वे डब्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा चांगलाच फज्जा उडत आहे.

Web Title: Better a poor horse than no horse at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.