जळगाव : तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. सध्या ‘सेक्सटॉर्शन’ करणारे रॅकेट सक्रिय झाले असून सोशल मीडियावर तरुणी अथवा महिलेच्या बनावट नावाने मैत्री केली जाते, नंतर अश्लील व्हिडिओ कॉल केले जात असून त्याद्वारे खंडणी मागितली जात असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. गेल्याच आठवड्यात जळगाव शहरातील एक वकील याला बळी पडले. त्याआधी मुक्ताईनगरातील उच्चभ्रू व्यक्तीही अशीच शिकार झाली. सायबर पोलिसांकडे अशा तक्रारींचा ओघ वाढतच चालला आहे.
सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गे होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे बहुतांश प्रकार प्रचलित आहेत. आता मात्र सायबर टोळ्यांनी ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीनच प्रकार सुरू केला आहे. जिल्ह्यात अनेक जण या ‘सेक्सटॉर्शन’चे बळी ठरले असून सहा जणांनी थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधून आपबिती कथन केली आहे. फेसबुकसह मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप, पॉर्न साईट आदी ठिकाणी सायबर गुन्हेगार बनावट खाती बनवून पीडित व्यक्तींच्या संपर्कात येतात.
खातेधारक व्यक्ती ही हायप्रोफाईल व सुंदर तरुणी असल्याचे भासविले जाते. प्रथम पीडित व्यक्तीसोबत चॅटिंग करून मैत्री केली जाते. नंतर प्रेमाच्या गप्पा करून अश्लील बोलण्यात गुंतविले जाते. बहुतांशवेळा समोरील व्यक्ती पीडित व्यक्तीला फेसबुक व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून एकांतात जाण्यास सांगते. यावेळी त्याला नग्न होण्यास सांगून अश्लील हावभाव करण्यास भाग पाडले जाते. याचवेळी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रित केला जातो. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्याचा व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण सायबर गुन्हेगारांना ऑनलाइन पैसे पाठवितात तर काही जण सायबर पोलिसांकडे तक्रारी करतात. शहरात वकिलाने सुरुवातीला पैसे पाठविले, नंतर थेट गुन्हाच दाखल केला. मुंबईत नुकताच एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाइन संपर्कात येऊन त्याचा मोबाइल, कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमध्ये घुसखोरी करणे, त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून
अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे, व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे.
कोणाला केले जाते लक्ष्य
सायबर गुन्हेगार पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्याआधी फेसबुकवर आधी त्याची प्रोफाईल पाहतात. ही व्यक्ती डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील अथवा उच्चपदस्थ नोकरी करणारी असेल तर त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले असून काहींनी भीतीपोटी पैसेही दिले आहेत.
बळी ठरू नये म्हणून काय काळजी घ्याल...
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. व्हिडीओ कॉलवर समोरील व्यक्ती सांगेल तसेच कृत्य करू नये. आपल्या फोनमध्ये अश्लील फोटो, व्हिडिओ सेव्ह करून ठेवू नये. ‘सेक्सटॉर्शन’ संदर्भात काही घटना घडली तर कुणालाही पैसे देऊ नयेत. यासंदर्भात तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले आहे.
कोट...
आपले सोशल मीडियाचे खाते हे लॉक असावे. तशी सेटीिग मोबाइलमध्ये करता येते. सेव्ह क्रमांकाच्या व्यतिरिक्त आपली वैयक्तिक माहिती किंवा फोटो कोणाला दिसत नाहीत. शक्यतो वैयक्तिक स्वत:चे फोटो सोशल मीडियावर नसावेत. सेक्सटॉर्शन’चा प्रकार घडला तर धमकीला न घाबरता थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.
-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक,सायबर पोलीस स्टेशन