नशिराबाद: रेल्वे लाईन विस्तारीकरणामुळे भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ दोन वर्षांपासून बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हाल होत आहे पर्यायी दिलेला रस्ता गैरसोयीचा ठरत असल्याने रेल्वे गेट १५३ जवळील प्रस्तावित रेल्वे अंडर बायपासचे काम पंधरा दिवसात पूर्णत्वास न आल्यास २० मार्च रोजी भादली रेल्वे स्टेशन येथे गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून माजी सरपंच पंकज महाजन यांनी रेल्वे विभागाचे मुख्य रेल्वे प्रबंधक यांच्याकडे दिला आहे.
तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणामुळे रेल्वे विभागाकडून प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८ या रस्त्याला असलेले रेल्वे गेट नं १५३ कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहे. परिणामी प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल वारंवार पाठपुरावा केला. पर्यायी रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता सुमारे दोन ते तीन तास घालवित लांबून फेऱ्याने शेतात जावे लागत आहे. रेल्वे गेट १५३ येण्या-जाण्यासाठी शेतकऱ्यांना खुले करावे. पंधरा दिवसात काम पूर्ण करावे अन्यथा रेल्वे स्टेशन येथे सकाळी ११ वाजता गांधीगिरी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनातून रेल्वे विभागाला दिला आहे. कंन्स्ट्रक्शन इंजिनियर राजेश चिखाले यांनी निवेदन स्वीकारले. निवेदन देताना माजी सरपंच पंकज महाजन सय्यद बरकतअली आदी उपस्थित होते.