बºहाणपूर-धुळे एसटी बसमधून भुसावळला चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीसह मद्यसाठा केला जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 05:20 PM2019-04-22T17:20:59+5:302019-04-22T17:21:30+5:30
रावेर : चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर पोलिसांनी केला १२ हजार ६०० रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त
रावेर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ एप्रिल रोजी मतदान होऊ घातले असल्याने मद्यविक्री बंद असताना चोरवड या मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने २२ रोजी बºहाणपूर-धुळे एसटी बसमधून १२ हजार ६०० रूपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला.
बºहाणपूरहून सुटलेली बºहाणपूर-धुळे एसटी बस (क्रमांक एमएच-४०/एन-९०३९) चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर पोहोचली. लोकसभा निवडणुकीनिमित्त तैनात असलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने सदर बसची झडती घेतली. त्यात स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख नवाब तडवी, कॅमेरामन योगेश पाटील यांच्या निरीक्षणाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मसरोद्दीन शेख व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी कसून झडती घेतली. त्यांना राहुल बेलचंद पटेल (वय २४, रा इतवारा गेट वार्ड क्रमांक १९, बºहाणपूर) याच्या सीटखाली काळ्या व तपकिरी रंगाच्या दोन बॅगा आढळल्या. त्या कोणाच्या आहेत? अशी चौकशी केली असता उभय आरोपीने त्याच्या मालकीच्या असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बॅगांची तपासणी केली असता त्यात १२ हजार ६०० रुपये किमतीच्या १८० मि.ली.च्या प्रत्येकी ४५-४५ विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. आरोपीस स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे पोलीसांनी मुद्देमालासह ताब्यात घेऊन रावेर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास चोरवड मध्य प्रदेश सीमा तपासणी नाक्यावर घडली.
मद्यसाठा बेकायदेशीररित्या चोरट्या मार्गाने भुसावळ येथे नेण्यासाठी अवैध वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बिजू जावरे, पो.कॉ.नीलेश चौधरी तपास करीत आहेत.