जळगाव : बीएचआर प्रकरणात अटक केलेला सूरज झंवर (२९,रा.जयनगर, जळगाव) याला पुणे विशेष न्यायालयाने शनिवारी ११ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सूरज याला शुक्रवारी रात्री जळगावातून अटक करण्यात आली होती. त्याने पिता सुनील झंवर व इतरांनी संगनमताने साई मार्केटींग अण्ड ट्रेडींग कंपनी या नावाने टेंडर भरल्याचे भासवून पुण्यातील निगडी, घोले रोड व नशिराबाद येथील मालमत्ता खरेदीत १६ कोटी रुपयांचा अपहार केला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मुदत ठेवीच्या पावत्या विकत घेऊन त्या बेकायदेशीर वर्ग करण्यात आल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पुणे पोलिसांनी झंवर कुटुंबियांची बँकेची माहिती घेण्याकरीता व खाते गोठविण्याकरीता बँकाना पत्रे दिलेली आहेत. त्यामुळे सूरज झंवर याने जळगाव येथील एचडीएफसी बँकेचे मॅनेजर व युनियन बँक ऑफ इंडियाचे नाशिक येथील रिजनल मॅनेजर यांना फोनद्वारे धमकी देऊन खाती खुले करण्याचे सांगितल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनी यांच्या खात्यावरुन निविदाधारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झालेले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात प्रकाश जगन्नाथ वाणी (ठाणे) व अनिल रमेशचंद्र पगारिया (रा.शिवराम नगर) या दोघांना ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे.