वासेफ पटेल
भुसावळ : शहराच्या पवित्र भूमीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे चरणस्पर्श झालेले आहे. डाॅ.आंबेडकर अनुयायी सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबवत युवकांना प्रेरणास्रोत व्हावे, असे कार्य करीत आहे. बौद्ध विहारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात विशेषत: आगवाली चाळ, चांदमारी चाळ, हद्दवाली चाळ, चाळीस बंगला, याशिवाय रेल्वेच्या काही परिसरांत भव्य असे पुरातन बौद्ध विहार मोठ्या दिमाखात उभे आहे. बौद्ध उपासक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आपापले विधी करत असतात.
२८ वर्षांपासून सहभाग
बौद्ध विहाराच्या शहरात रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी भीमराव छगन साळुंके हे गेल्या २८ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेत कार्य करीत आहेत.
अंधश्रद्धा दूर करण्यासाठी...
रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या आगवाली चाळसह परिसरात भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखेच्या अध्यक्षाच्या निवडीला प्रत्येक दोन वर्षांनी संधी मिळत असे. अध्यक्षपदाची संधी साळुंके यांना सन १९८९ला मिळाल्यानंतर त्यांनी सन १९९१ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ते १९९५ पर्यंत आंबेडकरांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढली, याशिवाय समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी वाटा उचलला आहे.
सातत्याने भरवत आहेत धम्म परिषद
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर २०११ यापासून, तर २०२० पर्यंत सम्राट अशोक बौद्ध धर्म परिषद खंड न पडता सातत्याने सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी प्रामुख्याने धम्म परिषद परिषद भरवली जाते.
अभ्यासिका हॉल देतो युवकांना प्रेरणा
नवीन पिढीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवावे, ‘शिक्षण हे हत्यार’ मानावे, याकरिता समाजातील काही कार्यकर्त्यांनी आगवाळी चाळीत अभ्यासिका हॉलची सुरुवात केली. या ठिकाणी अनेक गरीब घरांचे विद्यार्थी तासन् तास वेगळ्या विषयावर अभ्यास करीत असतात.
भाविक देतात भेटी
भुसावळ शहर हे मुळातच बौद्ध विहारांची ओळख निर्माण करणारे शहर आहे. शहरात ठिकठिकाणी प्रशस्त बुद्धांचे विहार आहेत. या ठिकाणी अनेक भाविक दरवर्षी भेट देत असतात.
बुद्ध पौर्णिमा तीन कारणांसाठी विशेष
बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं.
बुद्धांची शिकवण
बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्राथनास्थळं रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो.