'वेदांता' सारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे योग्य नाही, अजित पवारांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:51 PM2022-09-15T12:51:25+5:302022-09-15T12:51:37+5:30
Ajit Pawar : पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
- जिजाबराव वाघ
चाळीसगाव : देशात बेरोजगारीचा प्रश्न जटील झाला आहे, अशा स्थितीत ३ लाख तरुणांना रोजगाराची संधी असणारा 'वेदांता' सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणे योग्य नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा. यासाठी मुख्यंत्र्यांनी प्रयत्न करावेत. उगाच पळवाटा शोधून गाजर दाखवू नये. असा घणाघात गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केला.
पाचोरा येथे कार्यक्रमासाठी जात असताना अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी माजी आमदार राजीव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच, अजित पवार यांनी बाजार समितीला भेट देऊन तेथील अशासकीय प्रशासक मंडळाचे कामकाज जाणून घेतले.
अजित पवार पुढे म्हणाले की, मविआचे सरकार असतांना वेदांता प्रकल्प राज्यात व्हावा. यासाठी सकारात्मक भूमिका घेतली होती. सवलतींही दिल्या होत्या. तळेगाव येथे देखील निश्चित झाली होती. मात्र हा प्रकल्प इतर राज्यात गेला आहे. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांचे केंद्रात चांगले संबंध आहेत. त्यांनी त्याचा वापर करावा. दुसरा प्रकल्प येईल. अशा पळवाटा दाखवण्यासह गाजरही दाखवू नये.
यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा बँकेंचे संचालक प्रदीप देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जि.प.चे माजी सदस्य शशिकांत साळुंखे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे प्रशासक दिनेश पाटील, भगवान पाटील, अतुल देशमुख, चाळीसगाव विकासोचे चेअरमन प्रदीप देवराव देशमुख, व्हाईस चेअरमन प्रविण राजपुत, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.