मनपाचे रस्ते सोडून पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर मनपाकडून कोट्यवधींची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:25+5:302021-08-14T04:20:25+5:30

मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार : नितीन लढ्ढांनी प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुढील प्रस्तावांमध्ये होणार बदल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

Billions of rupees have been wasted on PWD roads by the corporation | मनपाचे रस्ते सोडून पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर मनपाकडून कोट्यवधींची उधळपट्टी

मनपाचे रस्ते सोडून पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांवर मनपाकडून कोट्यवधींची उधळपट्टी

Next

मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार : नितीन लढ्ढांनी प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुढील प्रस्तावांमध्ये होणार बदल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट बनली असताना, मनपाकडून शहरातील मनपाच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती सोडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती करून कोट्यवधींची उधळपट्टी केली आहे. विशेष म्हणजे हे रस्ते मनपाच्या नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत. याबाबतची माहितीही मनपा प्रशासनाला नसल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पुढील प्रस्तावांमध्ये बदल करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे.

शहरातील २० कि.मी.चे रस्ते ४ मे २०१७ रोजी मनपाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले होते. तसेच या रस्त्यांचे बांधकाम व देखभाल-दुरुस्तीचा खर्च देखील बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आला होता. मात्र, मनपा बांधकाम विभागाला या निर्णयाची माहितीच नसल्याने अनेक वर्षांपासून या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हे मनपाकडूनच केले जात होते. तसेच मनपा प्रशासनाने १०० कोटी रुपयांमधून होणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामांच्या प्रस्तावात देखील या रस्त्यांचा समावेश केल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन लढ्ढा यांनी हा प्रकार समोर आणल्यामुळे भविष्यात या रस्त्यांवर होणारा कोट्यवधींच्या उधळपट्टीचा खर्च तरी वाचणार आहे.

भोंगळ कारभार की उदासीनता?

गुरुवारी झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांची मालिकाच महासभेत मांडली. एकाच योजनेत नाही, तर प्रत्येक योजना, निविदा, विविध विकासात्मक कामांमध्ये मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुका आढळून येत आहेत. या चुकांमुळे महापालिकेला लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकीकडे विकास कामांसाठी मनपा प्रशासनाकडून आर्थिक परिस्थितीचा बहाणा केला जातो, तर दुसरीकडे मात्र मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या चुकांमुळे कोट्यवधींचा चुराडा होत असल्याने, अशा उदासीन अधिकाऱ्यांवर वचक आणण्याचे काम करेल तरी कोण, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

या रस्त्यांचा आहे समावेश...

१. कानळदा रस्ता ते टॉवर चौक

२. आसोदा रस्ता ते टॉवर चौक

३. टॉवर चौक ते काव्यरत्नावती चौक

४. टॉवर चौक, बेंडाळे चौक ते पाचोरा रस्ता

मनपा अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे नगरसेवकांवर शिव्या खाण्याची वेळ - नितीन लढ्ढा

मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून ज्याप्रकारे वारंवार चुका होत आहेत, त्यामुळे शहरातील विकास कामांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मनपातील प्रत्येक योजनेत, प्रत्येक कामात हे प्रकार वारंवार होत असल्याने जी कामे होत नाहीत, त्यांचा सर्व भार हा नगरसेवक व लोकप्रतिनिधींच्या माथी मारला जात आहे. मनपा अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे नागरिक थेट नगरसेवक व लोकप्रतिनिधींना जबाबदार धरून नागरिकांना शिव्याशाप देत असल्याची खंत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी बोलून दाखविली आहे. नागरिकांचा रोष हा नगरसेवकांवरच असतो, मात्र मनपा अधिकाऱ्यांच्या चुकांवर मात्र पांघरूण घालून वेळ मारून नेण्याचा भोंगळ प्रकार मनपात सुरू असल्याचेही लढ्ढा यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

आयुक्तांनी बोलावली विभागप्रमुखांची तातडीची बैठक

मनपाच्या महासभेत मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चुकांचा प्रताप समोर आल्यानंतर मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी सायंकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. तसेच मनपा अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या चुकांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच मनपा आयुक्तांनी वारंवार घडणाऱ्या प्रकारांमुळे मनपा अधिकाऱ्यांना खडसावत, चुका दुरुस्त न केल्यास कडक कारवाईचाही इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: Billions of rupees have been wasted on PWD roads by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.