कोरोना उपचारासाठी खाजगी रुग्णालयांना हमीपत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:44 PM2020-08-22T12:44:05+5:302020-08-22T12:44:14+5:30
आदेश : शासकीय दरच आकारण्याचा करावा लागेल उल्लेख
जळगाव : कोरोना उपचारासाठी परवानगी देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांकडून माहिती अद्यायावत केली जात नसल्याने या रुग्णालयांना परवानगी देताना अटी व शर्ती घालून देण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना निर्देश देण्यात आले आहेत. शासकीय दरच आकारात असल्याचा उल्लेख हमीपात्रात खाजगी रुग्णालयांना करावा लागेल.
यामध्ये खाजगी रुग्णालयांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. त्यात तज्ज्ञ मनुष्यबळ, उपचाराच्या सुविधा, माहिती अद्यायावत करणे, तसे न केल्यास परवाना रद्द करणे, शासकीय दराप्रमाणेच शुल्क घेणे या व इतर अटी-शर्तींचे हमीपत्र लिहून घेण्याचे निर्देश दिले आहे.
फायर व इलेक्ट्रिकल आॅडीट करा
जिल्ह्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णालय, कोविड उपचारासाठी राखीव रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल आॅडीट करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सा.बां. विभाग, उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
घरी आॅक्सिजन सिलिंडर दिल्यास पुरवठादारावर कारवाई
घरी आॅक्सिजन सिलिंडर पुरवठा करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुरवठादार कंपनीला दिले आहे. तसे झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय, खाजगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजन बेडची व्यवस्था असताना आॅक्सिजन पुरवठादार कंपनीकडून घरी आॅक्सिजन सिलिंडर पुरविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने या विषयी जिल्हाकाऱ्यांनी आदेश काढून संबंधित पुरवठा कंपनींना निर्देश दिले आहेत.