भारती सोनवणेंना मुदतवाढीसाठी मोर्चेबांधणी : ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळेंचे निष्ठेचे कार्ड ; तर प्रतिभा कापसेंचे शब्दाचे बाण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा महापौर व उपमहापौरपदासाठीची अडीच वर्षांची मुदत १८ मार्च रोजी संपत असून, त्यासाठी आता सत्ताधारी भाजपमध्ये आतापासूनच रस्सीखेच पहायला मिळत आहे. महापौरपदावरून भाजपत चार गट तयार झाले आहेत. आपापल्या गटातील एका सदस्याला महापौरपद मिळावे यासाठी नगरसेवकांकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. काही नगरसेवकांनी याबाबत गिरीश महाजन यांची भेट घेण्याचीही तयारी दर्शविली आहे.
सत्ताधारी भाजपचे ५७ नगरसेवक विविध इच्छुकांच्या बाजूने विभागले गेले आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपमध्ये रंगत येण्याची शक्यता आहे. भारती सोनवणेंना मुदतवाढ देण्यासाठी गट सक्रिय आहे. तर प्रतिभा कापसे यांना महापौरपदासाठी पक्ष नेतृत्वाने शब्द दिला असल्याचे सांगितले जात आहे. तर ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे यांच्याकडून भाजप निष्ठेचा राग आलापला जात आहे. तसेच उपमहापौरपदासाठी सामाजिक गणित आखले जात आहे. यामध्ये डॉ.चंद्रशेखर पाटील, भगत बालाणी यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
भारती सोनवणेंना मुदतवाढीसाठी लॉबिंग सुरू
विद्यमान महापौर भारती सोनवणे यांना १४ महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. मात्र, त्यातील बराच काळ हा कोरोनातच गेला आहे. त्यामुळे त्यांना अजून काही महिने मुदतवाढ देण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी सद्य:स्थितीत १२ नगरसेवक तयार झाले असून, याबाबतीत पुढील आठवड्यात सर्व १२ नगरसेवक गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रतिभा कापसेंसाठी पिंप्राळा भागातील नगरसेवक आक्रमक
माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले होते. त्यांना ही महापौरपदाचा शब्द भाजप नेतृत्वाने दिला असल्याने हे पद त्यांच्या पत्नी प्रतिभा कापसे यांना मिळावे यासाठी पिंप्राळ्यातील नगरसेवक आक्रमक असून, यासाठी पक्ष नेतृत्वाकडे सारखी मागणी केली जात आहे. तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांच्याकडेही काही नगरसेवकांनी या संदर्भात जाऊन भेट घेतल्याची चर्चा आहे.
भाजपतील निष्ठावानांचीही मोर्चेबांधणी
भाजपत महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच निर्माण झाल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात आलेले व पक्षात अनेक वर्षांपासून काम केलेले असे दोन गट पडले आहेत. अनेक वर्षांपासून भाजपचे काम करत असल्याने महापौरपदाची संधी मिळवण्यासाठी उज्ज्वला बेंडाळे व ज्योती चव्हाण या नगरसेविकादेखील आक्रमक झाल्या आहेत. ज्योती चव्हाण यांनीही गिरीश महाजन यांची भेट घेऊन, महापौरपदासाठी आपला दावा केला आहे. तर उज्ज्वला बेंडाळे यांच्याकडून काही नगरसेवकांचे समर्थन घेऊन दावा केला जात आहे.
हे देखील आहेत चर्चेत
प्रतिभा कापसे, भारती सोनवणे, उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण यांच्यासह दीपमाला काळे, मीनाक्षी पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे. यांच्या नावासाठी देखील चौथा गट भाजपत सक्रिय असून, दीपमाला काळे व मीनाक्षी पाटील यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच इच्छुकांकडून पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य राहिल, असे सांगितले जात असले तरी मोर्चेबांधणी व लॉबिंगमध्ये कोणताही इच्छुक मागे नसल्याचेच चित्र दिसून येत आहे.