लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरत असून रुग्णांची संख्या तसेच मृत्यू दररोज वाढत आहे, त्यामुळे भाजपचे जिल्ह्यातील सर्व आमदार राज्य सरकारला आमदार निधी मदत म्हणून देणार आहे. तसे पत्र भाजपच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
भाजपच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात येऊन आमदार निधी देण्याविषयी तयारी दर्शवली. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून राज्य सरकार संसर्ग रोखण्यात अपयशी ठरले आहे. तसेच जनतेच्या जीवाशी खेळत असून जळगाव जिल्ह्यातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी जिल्ह्यात पुरेसे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड, उपचारासाठी लागणारे वैद्यकीय साहित्य व रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होण्यासह जीवित हानी होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदार हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला आमदार निधी देण्यास तयार आहे, याद्वारे रुग्णांचे व नातेवाइकांचे हाल थांबून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रण येण्यास मदत होईल असे भाजपने म्हटले आहे.
निवेदन देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, सभापती जयपाल बोदडे, माजी आमदार स्मिता वाघ, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सरचिटणीस, डॉ. राधेश्याम चौधरी, मधुकर काटे, विशाल त्रिपाठी, सचिन पानपाटील, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.