‘त्या’ तीन नगरसेवकांच्याही अपात्रतेचा प्रस्ताव भाजपकडून होणार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:19 AM2021-06-09T04:19:02+5:302021-06-09T04:19:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत फुटलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावाबाबत सोमवारी भाजप गटनेते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत फुटलेल्या भाजपच्या २७ नगरसेवकांच्या अपात्रतेच्या प्रस्तावाबाबत सोमवारी भाजप गटनेते भगत बालाणी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील व नगरसेवक विशाल पाटील यांनी विभागीय आयुक्तांची भेट घेतली. तसेच नुकतेच भाजपमधून बाहेर पडलेल्या तीन नगरसेवकांचा अपात्रतेचा प्रस्तावदेखील भाजपकडून लवकरच विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती गटनेते बालाणी यांनी दिली.
भाजपातून फुटलेला २७ नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्ताव भाजपकडून नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे या प्रस्तावावर कोणतेही कामकाज झाले नव्हते. तसेच या प्रस्तावाबाबत विभागीय आयुक्तांनी काही त्रुटी काढल्या होत्या. या त्रुटींची पूर्तता सोमवारी भाजप नगरसेवकांकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात बंडखोर नगरसेवकांना सुनावणीसाठी नोटिसा पाठवल्या जाणार असल्याचीही माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.