भडगाव जि. जळगाव : एकाच विहिरीत आईसह दोन लेकरांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कनाशी शिवारात त्यांच्या स्वत:च्याच शेतात घडली. गायत्री दिनेश पाटील ( ४३), तिचा मुलगा खुशवंत (१० ) मुलगी भैरवी ( ८ ) अशी या मृत आई व मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , गायत्री ही दोन्ही मुलांसह कनाशी शिवारात असलेल्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी महिला व मुले घरी न परतल्याने शोधाशोध सुरु झाली. त्यावेळी काही जण शेतात पोहचले असता त्यांना विहिरीत तीनही जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांना लागलीच भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .
कनाशी येथील पोलीस पाटील अनिल सुरेश पाटील यांच्या खबरीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री ११:३० वा गायत्रीचे आई- वडिल व नातलग भडगाव येथे पोहचले. त्यांनी आपली मुलगी आणि नातूंचे मृतदेह पाहताच त्यांनी एकच टाहो फोडला.