लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील ममुराबाद गावाच्या शिवारात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. पोलीस प्रशासन व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळी प्राथमिक तपासणी करून बिबट्याचा मृतदेहाचा दुपारी ३ वाजता पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आला. त्याठिकाणी सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आला. शवविच्छेदन करणाऱ्या तज्ज्ञांनी युरिया मिश्रित पाणी पिल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान, शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, तपासणीसाठी नाशिक येथे रवाना करण्यात आला आहे.
ममुराबाद गावापासून काही अंतरावर नांद्रा फाटा असून, याठिकाणी रस्त्याच्या कडेलाच हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. नेहमीप्रमाणे शेतात जाणाऱ्या काही शेतमजुरांना हा बिबट्या निपचित अवस्थेत पडलेला दिसला. या बिबट्यावर विषप्रयोग करून त्याला ठार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला याठिकाणी आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण ममुराबाद शिवारात आजपर्यंत बिबट्या आढळून आल्याची एकही घटना घडलेली नाही. अशा परिस्थितीत थेट बिबट्या मृतावस्थेत आढळून येणे संशयास्पद असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.