बॉम्ब पेरणीचा फोन करणारा निघाला एसटी वाहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 02:23 AM2020-10-17T02:23:57+5:302020-10-17T02:24:04+5:30
अटक केल्यानंतर अमोल यास जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम. एम. चितळे यांनी त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.
जामनेर (जि. जळगाव) : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी चहुबाजुंनी बॉम्ब पेरून ठेवल्याचा फोन करणारा अखेर शुक्रवारी पोलिसांच्या हाती लागला. अमोल राजू देशमुख (३२) असे त्याचे नाव असून तो एसटीत वाहक आहे. त्याच्याकडून तब्बल १३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
अटक केल्यानंतर अमोल यास जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम. एम. चितळे यांनी त्याची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. सरकारी वकील कृतीका भट यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. मंगळवारी फडणवीस यांच्या हस्ते येथील ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आमदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करुन कार्यक्रमाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. तसेच टेक्स्ट मॅसेजद्वारे १ कोटीची खंडणी मागितल्याने खळबळ उडाली होती.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पहूर, पाचोरा, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर आदी ठिकाणी चौकशी केली. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुमारे १५ संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस मुख्य संशयितापर्यंत पोहोचले.राजकीय पक्षाशी संबंध नाही, अमोल देशमुख हा कुर्हाड (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी असून सध्या पहुरपेठमध्ये त्याचे वास्तव्य आहे. तो पाचोरा एसटी डेपोत वाहक असून त्याचे वडीलदेखील एसटीत वाहक होते. वडिलांच्या निधनानंतर नातेवाईकांनी प्रयत्न करून त्याला नोकरी लावून दिल्याचे समजते. तसेच, अमोल याचा राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे सांगितले जाते.