लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व पालकांना मागील वर्षाची पुस्तके शाळेत जमा करावेत, असे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागातील काही शाळांनी शालेय पोषण आहार वितरणाच्या निमित्ताने पालकांकडून पुस्तके जमा करून घेतली आहे. ही पुस्तके नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना वितरित केली जाणार आहे. मागील वर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे चार लाख २२ हजाराच्यावर विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानांतर्गत पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले होते. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे प्राथमिक विभागाची वर्षभर शाळा भरलीच नाही. तर ५ ते ८ वीपर्यंतची २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्यात आली. मात्र, त्यांचेही वर्ग काही दिवसच भरले. त्यामुळे मागील वर्षी विद्यार्थ्यांना वितरित केलेले पुस्तकांचा पाहिजे तसा वापरच झाला नसल्याने पुस्तके जशीच्या तशीच होती. त्यामुळे शिक्षण विभागाने पालकांना मागील वर्षीची पुस्तके परत करण्याची विनंती केली आहे. याबाबत शाळांनी पालकांना कल्पना दिली होती. त्यानुसार काही पालकांनी शाळांवर पुस्तके जमा केली आहे, तर काही शाळांवर एकाही पालकाने पुस्तके जमा केलेली नाहीत.
कागदाची होणार बचत
पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणात कागदांची बचत होणार असून, या माध्यमातून होणारा खर्चही वाचणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागू शकतो.
नवीन शैक्षणिक वर्षात वितरण
शाळांवर जमा केलेली पुस्तके ही नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशित लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरण केली जाणार आहेत. दरम्यान, किती पालकांनी शाळांवर पुस्तके जमा केली, त्याची आकडेवारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही.