जळगाव : किरकोळ रकमांवर डल्ला मारण्यापेक्षा कुठेही रेकॉर्ड नसलेल्या हवाल्याच्याच मोठ्या रकमेवर नजर ठेवून लूट करणे हीच खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (२२,रा.मोहाडी, धुळे) व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (१८९, रा.पवन नगर, धुळे) या दोघांची गुन्ह्याची पध्दत असून आतापर्यंत दाखल झालेले सर्वच गुन्हे हवाल्याच्या पैशांची लूट केल्याचे आहेत.
पिस्तूलचा धाक दाखवून जळगाव शहरातून १५ लाख रुपये लुटल्याच्या गुन्ह्यात खुशाल उर्फ मनोज व रितीक उर्फ दादू दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासातच या दोघांनी अविनाश सुरेश माने (१९,रा.दगडी चाळ, धुळे) याच्या मदतीने ५ डिसेंबर २०२० रोजी सायन बु.,ता.मालेगाव येथे सुनील श्रावण चौधरी (४४,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या कापूस व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून २० लाख रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला, हा गुन्हाही एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला असून त्यात अविनाश सुरेश माने याला ताब्यात घेऊन मालेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याकडूनही ७ लाख ३० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. मनोज व रितीक दोघंही सराईत गुन्हेगार आहेत. मनोज याच्याविरुध्द नाशिकमधील गंगापूर, अंबड, मुंबई नाका, यासह धुळ्यात ४ असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत तर रितीकविरुध्द धुळे व नाशिक उपनगर पोलिसात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये त्यांनी हवाल्याचेच पैसे लुटले आहेत.
अशी आहे गुन्ह्याची पध्दत
मनोज व रितीक या दोघांना नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे या चार ठिकाणी हवाल्याचा व्यवहार कुठे चालतो, कोणत्यावेळी पैसे जास्त असतात याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या कार्यालयांमध्ये २० ते ३० हजाराची रक्कम पाठवायची व ती रक्कम घ्यायला स्वत:च जायचे. तेथे काही वेळ थांबून रेकी करायची. कोणत्या व्यक्तीने जास्त रक्कम घेतली हे पाहून आपली स्वत:ची रक्कम घेऊन रक्कम घेऊन जाणाऱ्याचा पाठलाग करायचा व संधी मिळताच बॅग लांबवायची, काही धोका निर्माण झालाच तर पिस्तूलने फायर करायचे अशी या दोघांची पध्दत आहे. जळगावच्या घटनेत त्यांनी ३० हजार रुपये हवाल्याने पाठविल्याचे उघड झाले आहे. रितसर व्यवहाराचे नियमातील पैसे असले तर पोलिसात तक्रार होते, अवैध मार्गाने येणारा पैसा असला की त्याची ओरडच होत नाही हे देखील त्यातील गमक आहे.
पिस्तूल सहज उपलब्ध
जळगाव व धुळे जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशाला लागून असल्याने चोपडामार्गे सहज पिस्तूल उपलब्ध होतात. गुन्हेगारांशी संपर्क असल्याचे ती अडचण येत नाही. उमर्टी येथूनच दोघांनी पिस्तूल आणल्याचा संशय पोलिसांना आहे. या गुन्ह्यातील पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. लाखो रुपयांची लूट केल्यानंतर पैसे कुठे खर्च करतात, त्याचा वापर कुठे होतो हे अजूनही त्यांनी पोलिसांना सांगितलेले नाही.