पहूर येथे बीएसएनएलची सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:21 PM2019-01-17T22:21:30+5:302019-01-17T22:21:54+5:30
बँकींग सेवा कोलमडली
पहूर, जि. जळगाव : भारत दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलची सेवा पहूरसह परीसरात १५ दिवसांपासून कोलमडली आहे. याचा परिणाम दुय्यम निबंधक कार्यालय, बँकींग, पोलीस स्टेशन, टपाल कर्यालय, ग्रामपंचायत कार्यालय या प्रमुख कार्यालयांच्या कामगाजावर झाला असून नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
पोलीस स्टेशनमधील दूरध्वनी अत्यावश्यक सेवा असताना सेवा ठप्प झाली आहे. बँकींग व्यवहार ठप्प होण्यासह दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही. ई-महासेवा केंद्रातील कामेही ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणें जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ग्राहक सेवाही गेल्या तीन-चार दिवसांपासून बंद असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे नागरिकांचे हाल होत असून खेड्यावरून येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. आज घडीला सर्वच कामे आॅनलाईन असल्याने ही कामे खोळंबली आहे. संवादाबरोबरच संगणकीय कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला आहे. गावातील बीएसएनएल दूरध्वनी, भ्रमणध्वनींची सेवाही खंडित झाली आहे. ही सेवा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
बीएसएनएलची सेवा ठप्प असल्याने भ्रमणध्वनी, दूरध्वनी, संगणकीय कामकाज बंद अवस्थेत आहे. ग्रामपंचायतमध्ये आॅनलाईन कामे करताना कर्मचाºयांना अडचणी येत आहे.
- नीता पाटील, सरपंच, पहूर पेठ