सोशल मीडियामुळे फुटले वाहतूक पोलिसांचे बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:17 PM2019-01-18T12:17:49+5:302019-01-18T12:18:01+5:30
ट्रक चालकाला मारहाण प्रकरण
जळगाव : दोनशे रुपयांची लाच दिली नाही म्हणून वाहतूक पोलिसांनी सुरत येथील कंटेनर चालकाला काठी मारुन डोके फोडल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव पोलिसांच्या अनेक कारणांची चर्चा आता उघड होऊ लागली आहे. परराज्यातील वाहनधारकांची लूट करण्याचा जणू पोलिसांनी शासनाकडून परवानाचा घेतल्याची टीका होऊ लागली आहे. तर सोशल मीडियामुळे आता बिंगही फुटू लागले आहे. अल्पशिक्षीत असलेल्या ट्रक चालकाने पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा व्हीडीओ बनवून त्यांचा बुरखाच फाडला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचे तोटे तितकेच फायदेही आहेत. पुरावा असल्यामुळे घटना कोणीही नाकारु शकत नाही, हेदेखील यानमित्ताने अधोरेखित झाले आहे.
वाहतूक निरीक्षकांनी केली चूक मान्य
चांदकुमार (रा.पंजाब) या कंटेनर चालकाने जळगाव पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहिली असून मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. कंटेनर (ट्रेलर क्र.जी.जे.१९ एक्स १७४५) मालक ब्रिजमोहन दीपचंद अग्रवाल (रा.सुरत) यांनी हा प्रकार सत्यच असल्याचे ‘लोकमत’ ला सांगितले. इतकेच काय शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनीही अग्रवाल यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. चालक व पोलीस वाद झाला हे निरीक्षक मान्य करतात, मात्र पैसे किंवा मारहाणीबाबत इन्कार करतात. चालक मद्याच्या नशेत होता, तेव्हा त्याच्यावर ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ ची कारवाई करायला हवी होती, ती आमच्याकडून झाली नाही ही आमची चूक असल्याचे कुनगर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना मान्य केले आहे. या घटनेत नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांचा संबंध आहे, हे देखील कुनगर यांना सांगता आले नाही.
काय आहे मोडस आॅपरेंडी
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते खोटे नगरपर्यंत शहर वाहतूक शाखेची हद्द आहे. गुजराल पेट्रोल पंप, प्रभात चौक, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक व कालिंका माता आदी चौकात एकाचवेळी पाच ते सहा कर्मचारी तैनात असतात. परराज्यातील मालवाहू वाहन असो की परजिल्ह्यातील अन्य दुसरे वाहन असो. त्याचा क्रमांक पाहून पोलिसांकडून वाहन अडविले जाते. त्यानंतर हे वाहन चौकापासून काही अंतरावर नेऊन कारवाईचा धाक दाखवून वाहनधारकांकडून लाच मागितली जाते. ही लाच ५० रुपयापासून ते हजार, पाच हजाराच्या घरात असते. एखाद्या वाहनधारकाकडे कागदपत्रे किंवा परवाना नसला किंवा क्षमतेपेक्षा जास्त माल असला तर चालक कारवाई टाळण्यासाठी पैसे द्यायला तयार होता.
म्हणून पोलीस अधीक्षकांनी केली जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त
तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळात शहर वाहतूक शाखेच्या धर्तीवर जिल्ह्यातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा स्थापन करण्यात आली होती. त्यात एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक व ८० च्या जवळपास कर्मचारी होते. दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यानंतर काही दिवसातच त्यांनी ही शाखाच बरखास्त केली. जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांकडून मुळ काम सोडून भलतेच उद्योग होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे शिंदे यांनी हा निर्णय घेतला होता. या कर्मचाºयांना शहर वाहतूक व रिक्त पदावर सामावून घेण्यात आले होते.
बाहेर जिल्हा व राज्यातील वाहनांना अडवून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा उद्योग वाहतूक शाखेकडून अनेक वर्षापासून सुरु आहे. जळगावमध्येच हा प्रकार जास्त असल्याने पोलिसांची सर्वत्र बदनामी होते. आता तर कहरच झाला आहे. विशिष्ट रक्कम घेतल्याशिवाय घरी जायचेच नाही असे या कर्मचाºयांनी ठरविले असते.व्हायरल झालेला व्हीडीओ विशेष पोलीस महानिरीक्षकांना पाठविणार असून त्यांच्याकडे तक्रार करणार आहे. पोलीस अधीक्षकांनाही हा व्हीडीओ पाठविला, मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही. ट्रक चालकांना या पोलिसांचा प्रचंड त्रास आहे. या प्रकाराला चालक व मालक अक्षरश: कंटाळले आहेत.
-पप्पू बग्गा, अध्यक्ष, जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन
याआधी तीन प्रकरणात नामुष्की
शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांकडून पैशासाठी अडवणूक व दादागिरीचे प्रमाण वाढले आहे. काही प्रसंग तर पोलिसांच्या अंगाशी आले आहेत. शिर्डी येथून दर्शन आटोपून येणाºया मध्यप्रदेशच्या चार तरुणांची कार गेल्या वर्षी पोलिसांनी आकाशवाणी चौकात अडविली होती. त्यांच्याकडे पाच हजाराची मागणी केल्यावरुन वाद निर्माण झाला होता.
पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार देण्याची धमकी या तरुणांना दिली होती. तेव्हा या तरुणांना वाहतूक शाखेत आणण्यात आले असता त्यांनी लाच मागणीचा व्हीडीओच अधिकाºयांना दाखविला. तुम्ही आमच्यावर कारवाई कराच, आम्हीही एस.पींना भेटून तुमचे उद्योग दाखवितो अशी भूमिका या तरुणांनी घेतल्यानंतर पोलिसांनी नमते घेत तरुणांची माफी मागितली होती, तेव्हा कुठे वादावर पडदा पडला होता. हे सर्व तरुण उच्च घराण्यातील होते.
दुसºया एका प्रकरणात आकाशवाणी चौकातच लाच मागणाºया पोलिसाला कार चालकाने वाहनात डांबून अपहरण केले होते. खोटे नगरजवळ या पोलिसांना सोडण्यात आले होते. हे प्रकरण पोलीस स्टेशनला आल्यावर लाच मागणीतून हा प्रकार झाल्याचे उघड झाले होते. तेव्हा देखील पोलिसांची बदनामी झाली होती.
काही महिन्यापूर्वी एका ट्रकचालकाने वाहतूक पोलिसावर तलवार उगारली होती. कागदपत्रे नियमात असतानाही पैशाची मागणी करुन ट्रक अडवून धरण्यात आला होता. तेव्हाही हे प्रकरण चांगलेच गाजले होते. बाहेरील वाहने अडवून त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्याचे प्रकार हे सर्वाधिक जळगावातच असल्याची ओरड जुनीच आहे. जळगाव पोलीस दलाची बदनामी होऊनही पोलिसांच्या वागणुकीत सुधारणा झालेली नाही.
मुळात वाहतूक पोलिसांना कागदपत्रे तपासण्याचा अधिकारच नाही. वाहतूक नियंत्रण करणे हेच त्यांचे मूळ काम आहे. अनेक चौकात व मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असताना तेथे पोलीस नसतात किंवा असल्यावरही त्याकडे लक्ष नसते. महामार्गावर बाहेरील वाहनधारकांकडून पैसे वसूल करणे ही तर मोगलाईच झाली. वसुलीसाठी पोलीस महामार्गावर थांबतात. पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घालावे. पोलिसांच्या या चुकीमुळे जळगावचे नाव बदनाम होत आहे.
-किरण राणे, उद्योजक तथा उपाध्यक्ष, जिंदा