पार्टीला गेलेल्या बस चालकाचा जळगावनजीक वाघूर धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:33 PM2018-10-08T13:33:38+5:302018-10-08T13:35:08+5:30
मित्रांनी लपविली माहिती
जळगाव : मित्रांसोबत वाघूर धरणावर पार्टी करायला गेलेल्या सचिन नामदेव सपकाळे (वय ३५, रा. कल्याणी नगर, दादावाडी, जळगाव) या एस.टी.बस चालकाला धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. सचिन हा शनिवारी दुपारी चार वाजता पाण्यात बुडाला होता. १७ तास शोध मोहीम राबविल्यानंतर रविवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृतदेह हाती लागला.
पोलिसात तक्रारीचा दम भरताच सांगितली घटना
सचिन हा शनिवारी सकाळी सात वाजताच डोळे तपासणीच्या नावाखाली घरुन निघाला होता. ड्युटीला जाताना तो दररोज जेवणाचा डबा घेऊन जायचा. शनिवारी त्याने डबा नेलेला नव्हता. डबा घ्यायला परत येईल असे घरच्यांना वाटले होते, मात्र दुपारपर्यंत तो घरी न आल्याने भाऊ सुधीर व किरण यांनी त्याचा शोध घेतला. बस स्थानक, त्याचे बसण्याचे ठिकाण व मित्र यांच्याकडे चौकशी केली, मात्र त्याचा शोध लागला नाही. सायंकाळपासून सचिन व मित्रांचा मोबाईल क्रमांक बंद येत असल्याने पार्टीचीच शंका आली. दोन्ही भावांनी रात्री दहा वाजता त्याच्या मित्रांना गाठले. सुरुवातीला आम्हाला माहिती नाही असे सांगणाऱ्या मित्रांना पोलिसात तक्रार करण्याचा दम भरला असता त्यांनी सचिन हा वाघूर धरणात बुडाल्याची माहिती दिली.
धरणाच्या काठावर कपडे व मोबाईल
सचिन धरणात बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर भाऊ व अन्य नातेवाईकांनी रात्रीच वाघूर धरण गाठले. तेथे काठावर सचिन याचे कपडे, बुट व मोबाईल आढळून आला. पाण्यात रात्री उशिरापर्यंत शोध कार्य राबविले, मात्र रात्र असल्याने अडचणी येत होत्या. सकाळी ९ वाजता सचिनचा मृतदेह आढळून आला. तेथून तो जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
सचिन बुडाला अन् तिघे पळाले
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव एस.टी.आगारात चालक असलेला सचिन सपकाळे, प्रदीप वाघ, वाहक मिलिंद साळुंखे व विशाल थोरात असे चौघे जण शनिवारी सकाळपासूनच वाघूर धरणावर गेले होते. पार्टी करीत असताना दुपारी चार वाजता सचिन हा पाण्यात बुडाला. कोणालाच पोहता येत नसल्याने एकही जण त्याच्या मदतीला गेला नाही. सचिन बुडाला व परत न आल्याने घाबरलेल्या तिन्ही मित्रांनी धरणावरुन काढता पाय घेतला.
वाद झाल्याची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद साळुंखे, विशाल थोरात व सचिन सपकाळे यांच्यात पैशावरुन वाद होते. शनिवारीही त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे नेमकी घटना काय घडली याबाबत उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान, वाघूर धरण हे भुसावळ तालुका पोलिसांच्या हद्दीत असल्याने त्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे.
तिन्ही मित्र पोलिसात हजर
सचिनच्या मृत्यूनंतर घाबरलेले त्याचे तिन्ही मित्र तालुका पोलिसात हजर झाले. नातेवाईक व खात्यातील अन्य लोकांचा रोष यामुळे या तिघांनी पोलिसात हजर होणे पसंत केले. दरम्यान, यापूर्वीही तिन्ही मित्र सचिन याला कोकणात घेऊन गेले होते.